पान:भारतीय लोकसत्ता.pdf/२२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
२१
प्राचीन भारतांतील लोकसत्ता

भारतांतील अखिल ग्रंथसंभारांत सांपडत नाहीं. 'आपल्या नगरीचे राज्य बहुसंख्यांसाठीं आहे, अल्पसंख्यांसाठीं नाहीं, म्हणून आपल्या शासनास लोकशाही म्हणतां येतें. वैयक्तिक जीवनांत येथे प्रत्येक व्यक्ति सम असून सार्वजनिक जीवनांत ती आपल्या गुणांप्रमाणे उंच किंवा हीन ठरते. स्वातंत्र्य हे आपल्या व्यवहारांचे मूलतत्त्व आहे. आणि आपल्या शेजाऱ्याला आपल्या इच्छेप्रमाणे वर्तन ठेवण्याचा पूर्ण हक्क असून त्याचे वर्तन आपणांस अप्रिय असले तरी त्याच्यावर आपण संतापत नाहीं. या कारणास्तव आपला समाज लोकायत्त आहे असे आपण म्हणतों' असे उद्गार पेरिक्लीजच्या भाषणांत आढळतात. सॉक्रेटिसला अथीनी लोकसभेनें देहान्त शासन दिले. त्या वेळी त्यानें जे भाषण केलें त्यांतहि मनुष्याच्या विवेकस्वातंत्र्याचा त्याने पुरस्कार केला आहे. यावरून असे दिसतें कीं अथेन्समध्ये व्यक्तिस्वातंत्र्याचे तत्त्वज्ञान उदयास येऊन तेथील थोर पुरुष त्याचा प्रत्यक्ष आचारहि करीत होते. आणि हेंच तेथे लोकसत्ता उदयास आल्याचे खरे लक्षण समजले जाते. राज्यशासनाविरुद्ध आज जसे व्यक्तीला मूलभूत हक्क असतात आणि ते घटनेत नमूद केलेले असतात तसे ग्रीकांच्या लोकसत्ताकांत नव्हते, पण प्रत्यक्ष व्यवहारांत त्यांचा उदय झाला होता व व्यवहारांत आजच्या लोकायत्त शासनांत व ग्रीकांच्या शासनांत फारसा फरक नव्हता असे आपले मत हेन्री सिज्विक या पंडिताने नमूद करून ठेवले आहे. (दि डेव्हलपमेंट ऑफ युरोपियन पॉलिटी. दुसरी आवृत्ति पृ. १७१) राजकीय क्षेत्रांतील व्यक्तिस्वातंत्र्याचे हक्क व त्याहिपेक्षां व्यक्तिस्वातंत्र्याचे तत्त्वज्ञान हीं लोकशाहीचीं खरीं लक्षणें होत. भारतामध्यें प्राचीन काळीं राजकीय क्षेत्रांत व्यक्तिस्वातंत्र्याचें तत्त्वज्ञान उदित झाले असल्याचे त्या वेळच्या कोणत्याहि ग्रंथावरून दिसत नाहीं आणि असे असल्यामुळे येथे लोकशाहीचा उदय प्रथम झाला असे म्हणणे सयुक्तिक वाटत नाहीं.

संग्राम नाहीं

 पण याहिपेक्षां जास्त मोठा आक्षेप अजून पुढेच आहे. प्राचीन गणराज्ये खरीखुरी लोकायत्त होती या विधानावरचा तो आक्षेप माझ्यामतें अगदीं निर्णायक आहे. तो आक्षेप असा कीं, या सर्व गणराज्यांच्या