पान:भारतीय लोकसत्ता.pdf/२०८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२०७
भारतीय लोकसत्ता व समाजवाद


महात्माजींची भूमिका

 या काळांतले काँग्रेसचें धोरण म्हणने बव्हंशीं महात्माजींचें धोरण होय. १९२० सालापासून ते काँग्रेसचे एकमेव सूत्रधार होते आणि त्यांच्याशी कोणी कितीहि मतभेद व्यक्त केले तरी अंतिम निर्णय त्यांच्याच मताप्रमाणे होत असे, हें सर्वश्रुत आहे. समाजवादांत जी आर्थिक समता प्रतिपादिलेली आहे ती महात्माजींना संपूर्णपणे मान्य होती. कसेल त्याची जमीन व कारखान्यांत जो कष्ट करील त्याचें धन, हे तत्त्व यंग इंडिया, हरिजन या पत्रांत वेळोवेळी त्यांनी प्रतिपादिलेले आहे. प्रत्येकाला अन्न, वस्त्र, शिक्षण हे हक्कानें मिळाले पाहिजे. ज्या समाजांत हें मिळणार नाहीं तो रसातळाला जाईल, हा विचारहि त्यांनी अनेक वेळां सांगितला आहे. सध्यांची अर्थव्यवस्था, भांडवलदारी, जमीनदारी ही समाजस्वाथ्याला अत्यंत घातक असूनं अहिंसात्मक समाजरचनेचा आर्थिक समता हाच पाया असला पाहिजे, हा सिद्धांत त्यांच्या लेखणीतून वारंवार लिहिला गेला आहे. (हरिजन ५-१२-३६, २-१-३७, २०-५-३९, १५-७-४०, यंगइंडिया २६-११-३१, १६-४-३१). महात्माजी हा विचार लिहून थांबले असेंहि नाहीं. आपले सर्व जीवित त्यांनी दलित जनतेच्या उद्धारासाठी वाहून टाकले होते. या महासत्यावरूनहि त्यांच्या मनांतील आर्थिक समतेच्या अंतिम ध्येयाविषयीं संदेह रहाणार नाहीं.
 पण अशा तऱ्हेने आर्थिक समतेचें तत्त्व त्यांना मान्य असले, तरी ती प्रस्थापित करण्याचे समाजवादी मार्ग त्यांना मान्य नव्हते. जमीनदारांचें धन हिरावून घ्यावें, त्यांच्या जमिनी जप्त कराव्या, कारखानदारांचें भांडवलावरील स्वामित्व नष्ट करून ते उत्पादनसाधन जनतेनें ताब्यांत घ्यावें, संस्थानें सर्व खालसा करावी, यांपैकी एकहि गोष्ट त्यांना मंजूर नव्हती. घनिकांचे धन अशा तऱ्हेने हिरावून घेणें ही हिंसा आहे असें ते म्हणत. त्यांचा मार्ग अहिंसेचा आणि हृदयपरिवर्तनाचा होता. जमीनदारभांडवलदारांनी आपल्याजवळचें धन हे जनतेचें आहे व आपण केवळ विश्वस्त वा निधिधारक आहोत असे समजून आपल्या अत्यल्प गरजांपुरतेंच धन स्वतः वापरून बाकीच्या धनाचा विनियोग श्रमिक