पान:भारतीय लोकसत्ता.pdf/२०७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२०६
भारतीय लोकसत्ता

ते लोकप्रिय करण्याचे मोठें कार्य पंडित जवाहरलाल नेहरू यांनी काँग्रेसमध्ये राहूनच केलें. त्यांनाहि सोव्हिएट रशियानेंच स्फूर्ति दिलेली होती. १९२७ साली पंडितजी सोव्हिएट रशियाच्या दहाव्या वाढदिवसासाठीं मॉस्कोला गेले होते. तेथे आपल्याला समाजवादाचा संदेश मिळाला, असें त्यांनी स्वतःच आत्मचरित्रांत लिहून ठेविले आहे. 'माझी दृष्टि फांकून केवळ राष्ट्रवाद हा खात्रीनेंच अपुरा व संकुचित आहे असे वाटू लागले. राजकीय स्वातंत्र्य अवश्यमेव पाहिजे यांत शंका नाहीं, पण समाजाचें व शासनयंत्राचे स्वरूप समाजवादानुसारी बनविल्याशिवाय देशाचा अगर व्यक्तीचा फारसा उद्धार होणें अशक्य आहे, असे वाटू लागले. कांहीं दुःखद घटना घडत असल्या तरी सोव्हिएट रशियाबद्दल माझ्या मनांत प्रेम उत्पन्न होऊन, जगाला देण्यासारखा कांहीं तरी संदेश रशियापाशी आहे, असे माझे मन सांगू लागले.' असे त्यांचे निःसंदिग्ध उद्गार आहेत. कम्युनिस्ट व पंडितजी यांखेरीज भारतांत समाजवादी तत्त्वज्ञान प्रसृत करून आपल्या समाजाची पुनर्घटना करण्याची ईर्षा बाळगणारा तिसरा पक्ष म्हणजे सध्यांचा समाजवादीपक्ष होय. साथी जयप्रकाश नारायण, नरेन्द्र देव हे त्याचे नेते असून अशोक मेहेता, ना. ग. गोरे, पुरुषोत्तमदास त्रिकमदास प्रभृति मोठे कार्यकर्ते त्या पक्षांत आहेत. या पक्षाची स्थापना १९३४ साली झाली. प्रथम हा पक्ष काँग्रेसमध्येच पण एक स्वतंत्र गट म्हणून कार्य करीत होता. काँग्रेसलाच समाजवादी तत्त्वज्ञान स्वीकारावयास लावावयाचें, अशी त्याची ईर्षा होती; पण त्याविषयीं निराश झाल्यावर आणि काँग्रेसने स्वतःच्या संघटनेंत असे गट चालू द्यावयाचे नाहीत असा ठराव केल्यावर १९४८ सालीं हा गट काँग्रेसमधून बाहेर पडला व स्वतंत्र पक्ष म्हणून कार्य करूं लागला.
 भारतांतील समाजवादी चळवळीचा लोकशाहीच्या दृष्टीने अभ्यास करतांना कम्युनिस्ट पक्ष, पंडित जवाहरलाल व समाजवादी पक्ष या तिघांच्या कार्याचें विवेचन आपणांस केले पाहिजे. पण ते करण्यापूर्वी काँग्रेसची या नव्या प्रेरणेविषयी काय भूमिका होती ते पाहणे अवश्य आहे. कारण यावांचून या पक्षांच्या कार्याचे सम्यक् आकलन होणार नाहीं.