पान:भारतीय लोकसत्ता.pdf/२०६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२०५
भारतीय लोकसत्ता व समाजवाद

येथले व परकीय भांडवलवाले भस्म होतील आणि तसें झालें म्हणजे मग भारताला खरेखुरे स्वातंत्र्य मिळेल. सारांश, अखिल हिंदी लोक हा एक पक्ष व ब्रिटिश लोक हा दुसरा पक्ष, अशी राष्ट्रवादप्रणीत विभागणी न करतां हिंदी कामकरी- शेतकरीजनता हा एक पक्ष आणि ब्रिटिश व हिंदी भांडवलदार- जमीनदार हा दुसरा पक्ष, अशी मार्क्सवादप्रणीत विभागणी करून भारतीय स्वातंत्र्याचा लढा करावा, असें या नव्याने उदयास आलेल्या तत्त्वज्ञानाचे प्रतिपादन होऊं लागले. समाजवादी भूमिका ती हीच होय.

रशियाचा संदेश

 भारतामध्ये समाजवादी विचार व तत्त्वज्ञान प्रसृत करून त्या अन्वयें येथें चळवळी करण्यास प्रथमतः डांगे, मिरजकर, जोगळेकर, अधिकारी, निंबकर प्रभृति आज कम्युनिस्टपंथीय म्हणून प्रसिद्ध असलेल्या पुढाऱ्यांनीं प्रारंभ केला. रशियांत १९१७ अखेर कम्युनिस्ट क्रांति झाली. आणि पांचसहा भांडवली राष्ट्रांनी केलेले आक्रमण तोडून काढून तेथें कम्युनिस्ट पक्ष विजयी झाला. या त्याच्या यशामुळे जगाचे डोळे दिपून गेले व निराश झालेल्या जगाला एक नवा संदेश मिळाला. आतांपर्यंत जगाला संदेश फक्त अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी या राष्ट्रांकडूनच मिळत असे आणि भारतीय जीवनाचा आतांपर्यंतचा विकास ब्रिटनमधून आलेल्या तत्त्वज्ञानाच्या साह्यानेंच झालेला होता. व्यक्तिस्वातंत्र्य, लोकशाही, राष्ट्रनिष्ठा, उदारमतवाद, अनिर्बंध आर्थिक स्पर्धा, भांडवली कारखानदारी पद्धति, पार्लमेंट, निवडणुकी हीं तत्त्वे आणि याच्याच जोडीला शास्त्र, कला, साहित्य, शिक्षण, खेळ या क्षेत्रांतील भिन्न भिन्न तत्त्वे, मते व विचार हें सर्व भारतानें ब्रिटनमधूनच स्वीकारले होतें. म्हणजे अर्वाचीन भारतीय जीवनाचा पिंड हा ब्रिटिश संस्कृतीवर पोसलेला होता. १९२० सालापासून हा मनु थोडा पालटू लागला व सोव्हिएट रशियांतील तत्त्वज्ञानाचा व संस्कृतीचा भारतीय जीवनावर थोडा थोडा प्रभाव पडूं लागला. डांगे, मिरजकर या कम्युनिस्टांची प्रेरणा सोव्हिएट रशिया ही होती हें तर स्पष्टच होते; पण या क्षेत्रांत कार्य करणाऱ्या सर्वच कार्यकर्त्यांची ती प्रेरणा होती हें कमी अधिक प्रमाणांत सर्वांनी मान्य केले आहे. समाजवादी विचार प्रसृत करून