पान:भारतीय लोकसत्ता.pdf/२०५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२०४
भारतीय लोकसत्ता

भांडवलदार यांच्या ऐक्याचा ते उपदेश करीत. ब्रिटिश हे आपले शत्रू आहेत, त्यांच्याशी लढून आपणांस स्वातंत्र्य मिळवावयाचे आहे आणि त्यासाठी आपसांतील सर्व प्रकारचे भेद विसरून आपण संघटना केली पाहिजे, ही त्यांची भूमिका होती. शेतकरी व कामकरी यांची स्वतंत्र दुःखें व स्वतंत्र हितसंबंध आहेत हे त्यांना मान्य होतें; पण जशीं अस्पृश्यांची किंवा अल्पसंख्यांचीं दु:खे तशींच हीं आहेत, ते आपसांतले प्रश्न आहेत, राष्ट्रीय संटघनेच्या व राष्ट्रीय लढ्याच्या आड ते येतां कामा नयेत, असे त्यांचे धोरण होते.
 १९२० सालानंतर वर सांगितलेली जी राष्ट्रवादाची भूमिका तिच्याहून अगदीं निराळें व तिच्याशीं बरेचसे विसंगत असे एक तत्त्व उदयास येऊं लागले व १९२८ सालापासून त्याचे स्पष्ट प्रतिपादन होऊं लागले. शेतकरी व कामकरी या वर्गांचे हितसंबंध आणि जमीनदार व भांडवलदार यांचे हितसंबंध एक आहेत व राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या लढ्यांत यश आल्यास त्या भिन्न वर्गांचे सारखेंच कल्याण होणार आहे, हा राष्ट्रवादांतील सिद्धांत या तत्त्वानें अमान्य केला. भारतांतून ब्रिटिशांचें राज्य नष्ट झाले व त्या ठिकाणी हिंदी भांडवलदारजमीनदारांचें राज्य आले तरी ते ब्रिटिशांइतकेंच परकीय होय, असें हा नवा पंथ प्रतिपादूं लागला. ब्रिटिशांच्या राज्यांत शेतकरी- कामकऱ्यांची जी दैन्याची व हलाखीची अवस्था आहे, त्या वर्गावर जो अन्याय व जुलूम होत आहे, त्याची जी पिळणूक व शोषण या परकीय राज्यांत चालू आहे, तेंच शोषण, तीच पिळणूक हिंदी भांडवलदार- जमीनदारांच्या राज्यांतहि तशीच चालू राहील, त्यांत रतिमात्र फरक होणार नाहीं, असें समाजवादाचा अभ्यास केलेले तरुण लोक सांगू लागले आणि हें नवें तत्त्वज्ञान अंगीकारून लढ्याचे स्वरूप बदलले पाहिजे, असा त्यांचा आग्रह सुरू झाला. त्यांचे म्हणणे असे कीं, ब्रिटिशांशी आपण लढा केला पाहिजे हे खरें, पण त्या लढ्यांत शेतकरी आणि जमीनदार- भांडवलदार यांची एक आघाडी होणे शक्य नाहीं. ब्रिटिशांइतकेच येथले जमीनदार, भांडवलदार हे देशाचे शत्रू आहेत आणि म्हणून शेतकरी व कामकरी यांची संघटना करून स्वातंत्र्याच्या लढ्याचा एक भाग म्हणूनच या धनिकवर्गाशी आपण लढा सुरू केला पाहिजे. या एकाच लढ्यांत