पान:भारतीय लोकसत्ता.pdf/२०४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२०३
भारतीय लोकसत्ता व समाजवाद

आरंभ केला, त्या वेळीं तिच्या नेत्यांना राष्ट्रवादाशिवाय दुसऱ्या कोणच्याच तत्त्वज्ञानाचा परिचय झालेला नव्हता. आणि तसा परिचय होऊन त्याचा कांहीं उपयोगहि होण्यासारखा नव्हता. तेव्हां त्यांनी राष्ट्रनिष्ठेच्या पायावरच आपली सर्व इमारत रचण्यास प्रारंभ केला हें सयुक्तिकच झाले. भिन्न जाति, भिन्न पंथ, भिन्न धर्म हे सर्व भेद आपल्या समाजांतून मावळले पाहिजेत आणि आपण सर्व या भारतमातेची लेकरें आहोत ही भावना दृढ धरून आपण तिची सेवा केली पाहिजे, असा संदेश काँग्रेसच्या प्रत्येक अधिवेशनांत दिला जात असे. जातिभेद, धर्मभेद, प्रांतभेद याप्रमाणेच आर्थिक विषमतेमुळे पडणाऱ्या भेदांचाहि उल्लेख केला जाई व आपल्या राष्ट्रीय कार्यांत या भेदांचाहि प्रभाव दिसतां कामा नये, असा उपदेश त्या वेळचे नेते करीत असत. हिंदु व मुसलमान, स्पृश्य व अस्पृश्य, यांच्याप्रमाणेच श्रीमंत व गरीब हाहि भेद राष्ट्रकार्यात आपण दृष्टीआड केला पाहिजे, असें त्या वेळचे नेते कळकळीने प्रतिपादन करीत असत; आणि पुढे ब्रिटिशांशी लढा करण्याची भाषा सुरू झाली, त्यावेळी ब्रिटिशांचें राज्य नष्ट करून स्वातंत्र्य मिळविण्यांत या सर्वांचें सारखेच हित आहे असा विचार सर्वत्र रूढविला जात असे, शेतकरी व कामकरी या वर्गाचें स्वतंत्र अस्तित्व व त्यांचे भिन्न हितसंबंध लोकांच्या ध्यानांतच आले नव्हते, असा याचा अर्थ नाहीं. शेतकऱ्यांविषयी तर असे म्हणणे कदापि शक्य नाहीं. लोकमान्य टिळकांनी या वर्गांचे महत्त्व जाणून, काँग्रेसमध्ये हाच वर्ग प्रामुख्याने आला पाहिजे, हे सांगून, १८९६ पासून सार्वजनिक सभेमार्फत शेतकऱ्यांच्या चळवळीस प्रारंभहि केला होता; आणि महात्माजींनीं चंपारण्य, बार्डोली हे लढे शेतकऱ्यांच्या जागृतीसाठींच केले होते. १९१८ नंतर, कारखान्यांतील कामकऱ्यांचा जो स्वतंत्र वर्ग, त्याच्या स्वतंत्र अस्तित्वाची जाणीवहि तत्कालीन नेत्यांना झालेली स्पष्टपणे दिसते. लाला लजपतराय, चित्तरंजन दास हे काँग्रेसचे नेते ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचेहि अध्यक्ष झाले होते आणि त्यांच्या स्वतंत्र चळवळीचे महत्त्वहि त्यांनी मान्य केलें होतें. पण टिळक, गांधी, लालाजी व दास यांनी जे कार्य केले ते सर्व राष्ट्रीय भूमिकेवरून केले होते. ज्या भूमिकेवरून हिंदुमुसलमानांच्या किंवा उच्चनीच जातींच्या ऐक्याचें ते प्रतिपादन करीत, त्याच भूमिकेवरून शेतकरी व जमीनदार किंवा मजूर व