पान:भारतीय लोकसत्ता.pdf/२०३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२०२
भारतीय लोकसत्ता

व बाल्कन राष्ट्रक यांनी या नवतत्त्वज्ञानाचा स्वीकार केला नाहीं; म्हणून तीं या विसाव्या शतकाच्या प्रारंभापर्यंत अज्ञान, दण्डसत्ता व शब्दप्रामाण्य या नरकांत खितपत पडली होती. त्यांना स्वतःचे स्वातंत्र्यहि टिकवितां आलें नाहीं; मग लोकसत्ता दूरच राहिली. यावरून हा सिद्धांत ध्यानांत येईल कीं, लोकसत्ता यशस्वी व्हावयास समाज मध्ययुगांतून निघून अर्वाचीन युगांत येणें अवश्य असतें; आणि अर्वाचीन युगांत येणे म्हणजे बुद्धिप्रामाण्य, धर्मसुधारणा, समता, राष्ट्रनिष्ठा व समाजवाद या तत्त्वज्ञानांचा अवलंब करून त्या पायावर समाजाची पुनर्घटना करणे होय. भारतीय लोकसत्तेचा गेल्या शंभर वर्षांचा जो इतिहास आपण पाहिला, त्यावरून आपणांस दिसून आले आहे कीं, या शतकांतील आपल्या थोर नेत्यांनी याच मार्गाने पावले टाकली आहेत. राममोहन, रानडे, आगरकर, विवेकानंद, दादाभाई, टिळक व महात्माजी यांनीं, युरोपांत तीनचारशे वर्षे जी तत्त्वज्ञान रुजत होतीं व फुलत होत, त्यांचाच स्वीकार करून भारतीय समाजाला अर्वाचीन युगांत आणून सोडले. आपले हें भारतीय राष्ट्र समर्थ होऊन आपण नव्याने प्रस्थापित केलेली लोकसत्ता यशस्वी होईल अशी आशा वाटते, याचें हेच कारण होय. १९३० पर्यंत पश्चिम युरोपच्याच धोरणानें प्रवास करून रेनेसान्स, रेफर्मेशन, रेव्होल्यूशन व नॅशनॅलिझम या समाजरचनेच्या मूल तत्त्वांचा आपण अंगीकार केला, ती थोडीबहुत आत्मसातहि केली आणि त्यानंतर पश्चिम युरोप ज्याप्रमाणे राष्ट्रनिष्ठेनंतर समाजवादाकडे निघाला आहे, त्याचप्रमाणे आपणहि त्या नव्या धर्माची दीक्षा आपल्या समाजाला देण्याचा प्रयत्न करीत आहोत. भारतीय लोकसत्तेचा गेल्या सात प्रकरणांत आपण जो विचार केला, त्यांत वरील चार युगतत्त्वांचा आपण अभ्यास केला. आतां मार्क्सप्रणीत तत्त्वज्ञानाच्या प्रेरणेनें भारतांत ज्या समाजवादी चळवळी झाल्या व होत आहेत, त्यांचा अभ्यास करून भारतीय लोकसत्तेच्या प्रगतीच्या दृष्टीने त्यांचें मूल्यमापन करावयाचे आहे.

राष्ट्रवाद व समाजवाद

 काँग्रेस ही प्रारंभापासून राष्ट्रवादाचाच पुरस्कार करीत आली आहे. अर्थात् गेल्या शतकाच्या अखेरीस ज्या वेळीं या देशाच्या पुनर्घटनेस तिनें