पान:भारतीय लोकसत्ता.pdf/२०२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२०१
भारतीय लोकसत्ता व समाजवाद

असावी. वस्तुस्थितीसंबंधीचे हें अज्ञान मोठे विलक्षण आहे. जनतेच्या गरजा भागत नसतील, तर पुरेसे उत्पादन करण्यांत बिघडले कोठे ? नेहमींच दुष्काळांत खिचपण्यापेक्षा मोठया प्रमाणावर उत्पादन करणे बरें नव्हे काय ?
 या व इतर अनेक कारणांमुळे आमचे शेतकीविषयक व औद्योगिक प्रश्न संकुचित अशा स्वयंपूर्णतेच्या तत्त्वानें सुटणे इष्ट अथवा संभाव्य नाहीं, असें माझें मत झाले आहे व हीं कारणें आपल्या राष्ट्रीय जीवनाच्या सर्वच पैलूंना लागू पडतील अशी आहेत. संदिग्ध व भावनामय शब्दांच्या पसाऱ्यांत बुडी मारून बसणे योग्य होणार नाहीं. आपण परिस्थिति पारखून आपल्यांत फेरफार केला पाहिजे; तरच इतिहासाच्या हातची शिकार होण्याऐवजी आपणाला इतिहासाच्या पाठीवर स्वार होतां येईल." (पृ. ५३२)




प्रकरण आठवें


भारतीय लोकसत्ता व समाजवाद


 लोकसत्ता जी काय थोडीफार यशस्वी झाली, ती अमेरिका व ब्रिटन आणि पश्चिम युरोपांतील स्विट्झरलंड व हॉलंड या देशांत झाली. ते यश मिळविण्यासाठी त्या समाजांना गेल्या चारपांच शतकांत पांच भिन्न युगांतून प्रवास करावा लागला. विद्या व बुद्धिप्रामाण्य यांचें उज्जीवन (रेनेसान्स), धर्मसुधारणा (रेफर्मेशन), समताबंधुतास्वातंत्र्य (फ्रेंच रेव्होल्यूशन), राष्ट्रनिष्ठा (नॅशनॅलिझम्) व समाजवाद (सोशॅलिझम्) हीं तीं युगे होत. युरोपचा अर्वाचीन इतिहास हा या भिन्न युगांचा म्हणजेच या तत्त्वज्ञानांचा इतिहास आहे. मध्ययुगीन युरोप व अर्वाचीन युरोप याच्यांतला फरक म्हणजे हाच होय. या दृष्टीनें युरोपांतील जी राष्ट्र अर्वाचीन झाली, तींच जगांत उदयाला येऊन समर्थ झालीं व तेथेंच लोकशाही थोडीफार मूळ धरू शकली. स्पेन, पोलंड, झेकोस्लोव्हाकिया आणि पूर्व युरोपांतील रशिया