पान:भारतीय लोकसत्ता.pdf/२०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२००
भारतीय लोकसत्ता

टिकणार नाहीं हेहि खरें. पण या प्रमाणांत भलतीच वाढ होईल ही आशा धरून समाजरचना करणे घातक ठरेल. म्हणून कोणच्याहि लोकशाहीनें जागृत लोकमतावरच सर्व भार ठेवला पाहिजे. तें ज्या देशाला निर्मितां येईल त्याला महायंत्रोत्पादनाची व केंद्रीकरणाची भीति बाळगण्याचे कारण नाहीं.
 महायंत्रोत्पादनाचा असा आग्रह धरण्याचे मुख्य कारण म्हणजे त्यांतून निर्माण होणारी समृद्धि हे होय. समृद्धि, अलोट, अपार, कल्पनातीत समृद्धि असल्यावांचून बहुजनांच्या लोकशाहीची भाषा उच्चारतां सुद्धा येणार नाहीं. आणि बहुजनांची लोकसत्ता हे तर भारताचें ध्येय आहे. तेव्हां ग्रामवाद हा त्याने सर्वस्वी त्याज्य मानला पाहिजे.
 आरंभी म्हटलेच आहे, की ग्रामवाद हें गांधीवादांतले फार महत्त्वाचें तत्त्व आहे. कारण भारताची भावी रचना त्या तत्त्वानुसार करावी असे गांधीवादी पंडितांचे मत आहे. त्या ग्रामवादाचे येथवर विवेचन केले. आतां त्याचा समारोप करावयाचा. महात्माजचे पट्टशिष्य व सध्यांचे भारताचे भाग्यविधात पंडित जवाहरलालजी यांच्याच शब्दांत तो करणे हे अतिशय सयुक्तिक होईल. आपल्या आत्मचरित्रांत ते म्हणतात, "आणि पुन्हा एकदां गांधीजींच्या उलटसुलट धोरणाचा विचार मनांत येतो. एवढी कुशाग्रबुद्धि असून आणि दलित वर्गाविषयीं मनांत धगधगती आस्था असून मरणोन्मुख, कष्टप्रद आणि अनर्थावह अशा पद्धतीचा त्यांनी काय म्हणून कैवार घ्यावा ? प्रगतीच्या मार्गात खळगे खणून ठेवणाऱ्या जुन्या समाजपद्धतीच्या अवशेषांवर म्हणजे जमीनदार, तालुकदार, भांडवलदार यांच्यावर ते आपला वरदहस्त ठेवीतच आहेत, हे काय ? व्यक्तीच्या हाती अमर्याद सत्ता व संपत्ति ठेवावयाची आणि मग तिचा उपयोग ती सर्वस्वी जनहितासाठींच करील अशी उमद बाळगावयाची, ही निधिधारकत्वाची कल्पना बुद्धीला कितपत पटते ? प्लेटोच्या कल्पना सृष्टीतल्या राजर्षींनासुद्धां ही जबाबदारी संभाळणें जड गेले असतें. आणि जनतेच्या दृष्टीने विचार केला, तरी अशीं अतिमानवी माण तिच्या डोक्यावर बसविणे कितपत हिताचे ठरेल ? कांहीं काँग्रेसनेत्यांच्या छातींत औद्योगीकरण म्हटले की धडकी भरते. औद्योगिक राष्ट्रांत दिसून येणाऱ्या सर्व आपत्ति यांत्रिक उत्पादनामुळे उद्भवतात, अशी त्यांची समजूत