पान:भारतीय लोकसत्ता.pdf/२००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१९९
गांधीवाद व लोकसत्ता

मग लोकशाही बारा वाटां पळून जाईल. ग्रामवादामध्यें कारस्थानी व मस्त लोकांना सध्यांच्या समाजापेक्षां अनेक पटीने जास्त संधि मिळण्याचा संभव आहे. कारण त्या व्यवस्थेत माणसाच्या सत्त्ववृत्ति हिशेबाबाहेर गृहीत धरलेल्या आहेत. हातशक्तीनें जो माल करावयाचा तो यंत्रशक्तीनें कोणी निर्माण करावयाचा नाहीं, असा कायदा ग्रामवाद करणार. यांतून किती पळवाटा काढणे शक्य आहे हे सहज ध्यानांत येईल आणि कोणीहिं गुप्तपणें तसा माल काढला कीं हातमालाचे वाटोळे झालेच म्हणून समजावें. त्याचप्रमाणे ग्रामवादाचा स्वदेशीधर्महि फार बिकट आहे. दहापांच किंवा वीसपंचवीस ग्रामांचा जो गट ठरविला जाईल त्यांत निर्माण होणारा मालच प्रत्येकानें वापरला पाहिजे, असा स्वदेशीचा कायदा होणार. आतांपर्यंत ज्या आयात जकाती प्रांतांच्या किंवा देशाच्या हद्दीवर असत त्या, आतां प्रत्येक गटाच्या हद्दीवर येणार. खेड्यांतून हा बंदोबस्त चुकवून माल आणणे फारच सोपे असते हे सर्वांना ठाऊक आहेच. शिवाय आपल्या परिसरांत दुसरा माल येणार नाहीं अशी खात्री झाल्यावर तेथील कामगार उत्तम माल काढण्याची कसोशी करणार नाहीत. आणि किंमतीहि वाढवितील, असा संभव आहे. पण ग्रामवादी पंडितांच्या मतें असे होणार नाहीं. माणसें प्रामाणिकपणे वागतील असे त्यांनी गृहीत घरलेले आहे. मानवी सत्त्ववृत्तीला इतका ताण दिला तर ती तत्काळ तुटून गेल्याखेरीज रहाणार नाहीं; आणि समाजव्यवस्था तिच्यावरच उभी असल्यामुळे तीहि तत्काळ कोसळून पडेल.
 तेव्हां अशी भलतीच सत्त्ववृत्ति गृहीत न धरतां समाजाच्या जागरूकतेवरच सर्व भार ठेवणे अवश्य आहे. आणि तेंच समाजवादाचें तत्त्व आहे. जागृत, संघटित निग्राहानुग्रहसमर्थ असे लोकमत असल्यावाचून कोणत्याहि प्रकारची लोकशाही तगणार नाहीं. लोकसत्ता हा अखंड जागर, अहोरात्रीचा, जागर आहे. त्यांत तिळमात्र कसूर झाली तर सर्वनाश आहे. मग ती लोकशाही समाजवादी असो अगर ग्रामवादी असो. मानव हा कितीहि सत्त्वस्थ असला तरी स्वार्थ, लोभ, वासना यांच्या अधीन तो होणारच हें, धरून चालले पाहिजे. त्याच्या सत्त्ववृत्तीला अवाहन करीत राहिले पाहिजे हे खरें. आणि सध्यांपेक्षां सत्त्ववृत्तीचे प्रमाण वाढले नाहीं तर लोकशाही