पान:भारतीय लोकसत्ता.pdf/१९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१९८
भारतीय लोकसत्ता

हीं गृहीत धरलीं आहेत. हातव्यवसायाच्या जोडीला लहान यंत्रे देऊनहि, ग्रामवाद समृद्धि अशी कधीच निर्माण करूं शकणार नाहीं. सर्व लोकांनी साध्या रहाणीवर संतुष्ट राहिले पाहिजे, असा त्याचा आग्रह आहे. भरड कापड, कागद, गवती छपराची घरें, लोखंडी सामानहि बोजड, प्रवासाच्या बेताच्या सोयी यांवर शेंकडा शंभर लोकांनी संतुष्ट राहिले पाहिजे. आणि ते संक्रमण- कालापुरतें असें नव्हे. तर जन्मोजन्मी ! कारण यापेक्षा जास्त धन ग्रामवादांत कधींच निर्माण करणे शक्य नाहीं. मानवी मनोवृत्तीचा अगदीं अल्प जरी विचार केला, तरी हा निवृत्तीचा विचार किती घातकी आहे तें ध्यानांत येईल. मानवी प्रवृत्तीचा सर्व ओघ करणरूप कृतीकडे, 'अस्ती' कडे, अधिकाकडे, आहे. अकरणरूप किंवा ऋण कल्पना तिला मानवत नाहींत. 'नास्ति', 'निवृत्ति', 'ऋणप्रवृत्ति' हें मानवावर लादणें अगोदर अशक्य आहे. आणि ते लादले तर मानव मिथ्याचारास प्रवृत्त होऊन त्याचा अधःपात होतो. भोगावें, चढावें, प्रतीकार करावा, गगनाला जावे, आक्रमावे, व्यापावे या त्याच्या प्रवृत्ति आहेत. यांना कांही मर्यादा घालतां येतील. कांहीं काळ जरा जास्त कठोर बंधनांत त्या ठेवतां येतील; पण समाज हा धनदिशा कायमची सोडून ऋण दिशेला जाण्याची अपेक्षा करणे. अगदीं भयावह आहे. उत्तम कापड नाहीं. उत्तम घर नाहीं. सुख नाहींत. कधींहि प्रतिकार नाहीं. परचक्राला तर नाहींच; पण चोर- दरवडेखोर आले तरी त्यांचा प्रतिकार न करता त्यांच्या गांवाला संतमंडळ पाठवावयाचे व त्यांना शिक्षण देऊन संतुष्ट करावयाचें ! आणि ही अपेक्षा बहुसंख्यांकडून ! बहुसंख्यांकडून उच्च त्याग, सत्त्ववृत्ति, अहिंसा, असंग्रह यांची कायम अपेक्षा करीत गेल्यास ते गुण तर दिसणार नाहींतच, पण त्यांचा कमालीचा अधःपात मात्र होईल. त्याग, अप्रतीकार यांचा उपदेश करतांना विशाल मन, कमालीची उदार वृत्ति, निर्लोभता ही गृहीत धरलेली असतात. बहुसंख्यांकडून हें अपेक्षिणे व्यर्थ आहे. आणि या गुणांच्या अभावीं अप्रतिकार म्हणजे भ्याडपणा व त्याग म्हणजे मनाचें दैन्य असा अर्थ होतो. ग्रामवादाचा हा परिणाम अटळ आहे. आणि समाज असा दीनदुबळा झाला, की जे कांहीं अल्प धन तो निर्माण करील तें अल्पसंख्य असे साहसी, आक्रमक, मदमस्त व गुंडप्रवृत्तीचे लोक बळकावून बसतील.