पान:भारतीय लोकसत्ता.pdf/१९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१९४
भारतीय लोकसत्ता

शेवटी हें संग्राम सशस्त्र क्रान्तीचेच रूप घेऊं लागले होते. याचा अर्थ असा कीं, आरंभी जरी प्रतिकार अहिंसक असला, तरी शत्रूला पराभूत करून त्याला हद्दपार करण्यास सशस्त्र युद्धावांचून अन्य उपाय नाहीं. आणि हे सत्याग्रह-संग्राम, अहिंसेचे संग्राम, हे सुद्धां इंग्रजासारखे थोडे सौम्य, प्रारंभी तरी कायद्याच्या आश्रयाने चालणारे राज्यकर्ते असले तर चालणार. गांधीवादाचे एक प्रमुख पुरस्कर्ते आचार्य शं. द. जावडेकर यांनी 'भारतीय क्रान्ति व राष्ट्रसभा' या आपल्या लहान पुस्तकांत एक मोठा समंजस विचार मांडला आहे. 'ब्रिटिश सरकार आरंभी पुष्कळसे कायद्याच्या आश्रयानें राज्य करीत होते. त्यामुळे त्या वेळी राष्ट्रसभेनें जुनें सत्याग्रही तंत्र स्वीकारले; पण पुढे सरकार रानटी झालें. दंडुक्यानें राज्य करूं लागले. अशा स्थितीत प्रजेनें अहिंसा बाजूस ठेवून प्रतिकार केला तर तिला दोष न देतां तिचें अभिनंदन करणे प्रत्येक अहिंसावाद्याचे कर्तव्य आहे.' (पृ. १६). याचा अर्थ स्पष्ट आहे. कांही एका मर्यादेपलीकडे अहिंसेनें जुलमाचा प्रतीकार करणे शक्य नाहीं, असाच आचार्यांचा अभिप्राय आहे. हे प्रस्थापित सरकारविषयीं झालें. मग झंझावाताप्रमाणे आक्रमण करून येणाऱ्या पाशवी सत्तेचा प्रतीकार अहिंसेने करूं पहाणें किती हास्यापद आहे हे सहज कळून येईल, आणि अशा रीतीने स्वसंरक्षणासाठी सर्व लष्करी सिद्धता अवश्य आहे असे ठरल्यावर ग्रामवादांतील अल्पयंत्रनिष्ठ उत्पादन समाज्याच्या गरजा भागविण्यास अत्यंत अपुरें पडेल हे निराळे सांगण्याची गरज नाहीं. आणि हे ध्यानांत घेतल्यावर ग्रामवाद ही एक कविकल्पना म्हणून सोडून देणे प्राप्त आहे.

विकेन्द्रीकरण

 समाजवादावर ग्रामयावादाचा मुख्य आक्षेप आहे, तो त्यांतील औद्योगिक केन्द्रीकरणाविषयीं. महायंत्रोत्पादन हे केंद्रीकरणावांचून अशक्य आहे. आणि आपण उद्योगाचें व धनाचें केन्द्रीकरण स्वीकारले की सत्तेचें केन्द्रीकरण हे अटळ आहे असें ग्रामवादाचें म्हणणे आहे. २३ जुलै १९५० च्या भारतज्योतीमध्ये आचार्य कृपलानी यांनी आपल्या 'सेव्ह खादी टु सेव्ह डेमॉक्रसी' या लेखांत हेच प्रतिपादन केले आहे. सत्तेचें केन्द्रीकरण म्हणजे लोकशाहीचा