पान:भारतीय लोकसत्ता.pdf/१९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१९३
गांधीवाद व लोकसत्ता

पाहिली म्हणजे तो दोरीसूत येतो व उदार हस्तानें धनधान्य देऊ लागतो. ग्रामवादांतील यंत्रावर विसंबून राहिलो तर सध्यांच्या जनतेला पुरेसे सकस अन्नहि मिळणार नाहीं; मग इतर धनाची गोष्ट कशाला ? आणि समृद्धि ही तर ग्रामवादी भारताला स्वप्नांतहि आणतां येणार नाहीं.
 तरी वरील खर्चांत लष्कराचा व एकंदर संरक्षणाचा खर्च धरला नाहीं. तो खर्च ग्रामोद्योगाला म्हणजे हातशक्तीनें निर्माण होणाऱ्या धनाला मुळींच परवडणार नाहीं, हें ग्रामवादी पंडितांनींच मान्य केले आहे; पण त्यावर त्यांचे उपायहि आहेत. एकतर आपले जीवन इतके साधें, गरिबीचे व अनाकर्षक ठेवावयाचें कीं, दुसऱ्याला आक्रमण करण्याचा मोहच पडूं नये आणि तरी आक्रमक आलाच तर त्याचा प्रतीकार अहिंसेने करावयाचा. यांतील पहिला भ्रांतिजन्य व दुसरा अशक्य असा आहे. महंमद गझनी किंवा नादिरशहा हे फार तर लुटीच्या आशेने आले असतील; पण जे साम्राज्यप्रस्थापनेसाठी येतात ते आकर्षक जीवनाच्या लोभानें येत नाहींत. जमीन, इतर धन व गुलामासारखी राबण्यास मिळणारी माणसें, यांसाठीं ते येतात. मोंगल यासाठींच आले. फ्रेंच, पोर्तुगीज, डच, इंग्रज यासाठींच आले. हल्लींचे आक्रमक तर केवळ भूमीसाठींच येतात. माणसांचा संहार करून आपल्या माणसांना उद्योग मिळवून द्यावा हा त्यांचा हेतु असतो. हिटलर, मुसोलिनी यांनी हे हेतु जाहीर केले होते. इंग्रज हिंदुस्थानांत आले, ते येथील धनाची कीर्ति ऐकून आले असतील. पण ते अमेरिका, अर्जेंटिना, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, इजिप्त, अरबस्तान, न्यूझीलंड या देशांत तेथील जीवन आकर्षक होते म्हणून गेले नाहींत. तेव्हां आपण अगदी रंडकें व सुतकी जीवन अवलंबिले तरी आक्रमक थांबणार नाहीं. तो येणारच.
 हे जे आक्रमण येणार त्याचा अहिंसेनें व सत्याग्रहानें प्रतिकार करणें कितपत शक्य आहे, याचा विचार आपण मागेंच केला आहे. प्रत्यक्ष महात्माजींनासुद्धां तें साधलें नाहीं. त्यांनी ज्या सत्याग्रहमोहिमा केल्या, त्या सर्व निःस्त्रप्रतिकार मोहिमा झाल्या आणि त्यांनीं जनताजागृति फक्त झाली.
 भा. लो.... १३