पान:भारतीय लोकसत्ता.pdf/१९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१९२
भारतीय लोकसत्ता

कुटुंबाला दोन खोल्या तरी जागा देणे, आणि ती जरा सरळ भिंती व सपाट जमीन असलेली अशी देणे, अवश्य आहे. मनुष्यजातीसारखे रहावयाचे एवढ्यासाठी ही जागा अवश्य असते. शिवाय इतकी जागा असली तरच मुले थोडा विद्याभ्यास बरा करूं शकतील. तेव्हां इतकीं घरें पुरविण्यास पुरेसें धन हवें. सार्वजनिक प्रपंच लोकायत्त पद्धतीने चालवावयाचा म्हणजे ग्राम-पंचायती, नगरपालिका, लोकल बोर्डे, असेंब्ली, कौन्सिलें हीं अवश्य होतात. एवढ्यांसाठी इमारती, निवडणुकांचे खर्च, त्या प्रतिनिधींचा प्रवासखर्च, त्यांना लागणाऱ्या साधनांचा व उपकरणांचा खर्च व त्यांचे पगार इतके धन संपादिले पाहिजे. सर्वप्रकारच्या संशोधनसंस्था या लोकायत्त जीवनाला हल्लीच्या पेक्षांहि जास्त प्रमाणावर लागणार, हें ग्रामवादालाहि मान्य आहे. वेधशाळा, रसायनशाळा, शेतीच्या, वैद्यकाच्या प्रयोगशाळा, इतिहास, भाषा यांचीं संशोधनमंदिरें यांवांचून राष्ट्रीय प्रपंच चालणार नाहीं. हा खर्च झेपेल इतके धन समाजाने पैदा केले पाहिजे. याशिवाय समाजाची करमणूक, त्याचा थोडा तरी किमान प्रवास, लक्षावधि बालकांची खेळण्याची व रमण्याची व्यवस्था, सार्वजनिक उद्यानें, यांची जबाबदारी समाजानें घेणें अवश्य आहे. म्हणजे एवढे धन निर्माण केले पाहिजे. हे सामाजिक जबाबदारीचे विषय झाले, याशिवाय प्रत्येक घरीं आणखी जबाबदाऱ्या असतातच. लग्नमुंजीसारखे मंगलप्रसंग, सणवार, उत्सव यांचा खर्च, कांहीं कलेची उपासना करावयाची तर खर्च; हे खर्च वैयक्तिक असले तरी त्याला अवश्य असलेले धन कोठून तरी निर्माण झालेंच पाहिजे. आणि ती जबाबदारी, अप्रत्यक्षपणे का होईना समाजाचीच आहे.
 ग्रामवादाचे, ग्रामोद्योगाचे व सर्वोदयाचे पुरस्कर्ते असा आग्रह धरतात कीं, समाजाच्या प्रत्यक्ष भोगवट्याच्या वस्तू माणसानें हातानेंच निर्माव्या. फारतर लहान यंत्राचें साह्य घ्यावें. येवढ्या क्षुद्र शक्तीच्या साह्याने सध्यांच्या समाजाला अवश्य असलेले भोगवट्याचे धन निर्माण होणे कदापि शक्य नाहीं. निसर्ग हा अत्यंत कृपण व स्वार्थी आहे. साध्या नांगराला व कुऱ्हाडीला तो मुळीच दाद देत नाही. त्याच्या आघातांनीं तो प्रसन्न होत नाहीं व झालाच तर मापटें चिपटें धान्य मानवाच्या पदरांत टाकण्याइतकाच होतो. वीज पेट्रोल, वाफ, अणु यांच्या सामर्थ्याने चालणारी महायंत्रें त्याने