पान:भारतीय लोकसत्ता.pdf/१९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१९१
गांधीवाद व लोकसत्ता

पटीने तरी वाढल्या आहेत. आणि एक संघटित व प्रभावी लोकसत्ताक म्हणून जर आपणांस जगावयाचे असेल तर त्यांतल्या कोणच्याहि गरजा कमी करणे शक्य नाही. त्या किमान गरजा आहेत. गांधीवादाला ज्या गरजा कमी करावयाच्या आहेत, त्या अगदीं निराळ्या. वर उल्लेखिलेल्या गरजा गांधीवादी पंडितांनींहि मान्य केलेल्या आहेत.
 अन्न व वस्त्र ही पहिली गरज, ही मागें होती; पण प्रत्येकाला अन्नवस्त्र मिळाले पाहिजे, ही जबाबदारी मागें कोणाच्याच शिरावर नव्हती. आतां समाज ती घेणार आहे; आणि प्रत्येकाला तांदूळ, गहूं, ज्वारी, बाजरी असें सकस अन्न आणि एरवी साधे व थंडीत उबदार वस्त्र, हे पुरवावयाचें म्हणजे उत्पन्नाची अनेक पटीने वाढ झाली पाहिजे. सर्वांना शुद्ध पाणी मिळेल ही व्यवस्था यापुढे समाजाने म्हणजेच सरकारने केली पाहिजे. पूर्वी शेकडा नव्वद खेड्यांत ती नव्हती. अजूनहि नाहीं. ती करावयाची म्हणजे तळीं, विहिरी, बंधारे हे प्रत्येक खेडयांत अवश्य आहेत. त्याला साधन-सामग्री म्हणजेच धन लागणार. अखिल जनतेच्या आरोग्याची व्यवस्था पूर्वी कोणीच करीत नसे, ती आतां करावी लागणार. त्यासाठी औषधें, उपकरणे, रुग्णालयें, वैद्य, परिचारिका यांची जरूर लागणार. त्यांचा पगार, व साधनांचा खर्च, समाजाने साहणे अवश्य आहे. एका पंढरपूरच्या यात्रेच्या वेळीं नुसतें फिनाईल किती ओततात एवढा हिशेब केला, तर हल्लींच्या सामाजिक जीवनाच्या प्रपंचासाठी पूर्वीच्या कितीतरी पटीनें धन जास्त अवश्य आहे हे कळून येईल. पूर्वी सामाजिक जीवनच नव्हते. आरंभींच्या प्रकरणांत सांगितल्याप्रमाणे त्याचे चिंतन कोणीच करीत नसे; पण लोकायत्त संघटित समाजानें हें चिंतन केले पाहिजे आणि या जवाबदाऱ्या पतकरल्या पाहिजेत. त्या पतकरावयाच्या तर पूर्वीच्या पेक्षां अनेक पटीने धननिर्मिति केली पाहिजे. अखिल जनतेच्या शिक्षणाची उपेक्षा करून यापुढें चालणार नाहीं. सर्व जनतेत राजकीय प्रबुद्धता कायम ठेवावयाची तर स्वभाषा, इतिहास, भूगोल, विज्ञान, गणित, व एखादी परकी भाषा इतकें शिक्षण तरी किमान अवश्य आहे. म्हणजे इतक्या इमारती, इतके शिक्षक, इतकी पुस्तकें व इतर उपकरणे, विद्यापीठें, परीक्षामंडळे यांचा खर्च आला. (मागे यासाठी सध्यांच्या एकलक्षांश सुद्धां खर्च नसे.) नंतर प्रत्येक