पान:भारतीय लोकसत्ता.pdf/१९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१९०
भारतीय लोकसत्ता

साठीं इतिहासाकडे पाहू लागतो. आपण जी स्थिति निर्माण करणार तशी पूर्वी एकदां होती हें दाखविणे त्याला अवश्य वाटू लागते. मार्क्सवादी, वंशवादी इ. अनेक लोकांनी हेच केले आहे. गांधीवादांतील चरखा, ग्रामोद्योग, विकेन्द्रीकरण व तदधिष्ठित लोकसत्ता यांचे समर्थन करण्यासाठी कुमाराप्पांनींही याच मार्गाचा अवलंब केला आहे. पूर्वीच्या ग्रामव्यवस्थेत विकेंद्रीकरण होते तरी हिंदुस्थान पराभूत कां झाला असा प्रश्न केल्यास ते म्हणतात, आपण ते सोडून देऊन उद्योगधंद्यांच्या केन्द्रीकरणाचे धोरण अवलंबिल्यामुळे आपला नाश झाला. वास्तविक केन्द्रीकरण झाले १९ व्या शतकाच्या अखेरीस, आणि अगदी खरे म्हणजे विसाव्या शतकांत, आणि तें इंग्रज आल्यावर. पण त्याच्यापूर्वी अफगाण, तुर्क, मोंगल, पोर्तुगीज, डच, फ्रेंच या सर्वांपुढे भारतीयांनी हार खाल्ली होती. आणि पुढे इंग्रजांनींहि त्यांना नमविलें, इंग्रज येण्याच्या आधीं विकेन्द्रीकरणच होते. चरखा होता, स्पर्धा नव्हती. सहकार्य होते. दुष्ट पाश्चात्य विद्येचें वर्चस्व नव्हते. म्हणजे जी व्यवस्था आतां निर्मामावयाची आहे ती सर्व होती. तरी आक्रमण, पारतंत्र्य, उपासमार, रोगराई यांतले कांहीं टळले नाहीं.
 आपल्या प्राचीन ग्रामव्यवस्थेविषयों व त्या शेतकऱ्याविषयी पंडितांनी निर्माण केलेला भ्रम दूर झाला तर 'ग्रामवादा' चा भ्रामकपणा व घातकपणा आपल्या ध्यानांत येणे सुलभ होईल.

अक्षय समृद्धीची आवश्यकता

 पहिली गोष्ट अशीं कीं अखिल भारतीय समाज हा एक समाज आहे हें एक संघटित राष्ट्र आहे, हे एक लोकसत्ताक आहे, अशा दृष्टीने जर यापुढे आपणांस जगावयाचें असेल तर त्यासाठी जे किमान धन अवश्य आहे तें ग्रामवादांतील अल्पयंत्रांच्या साह्याने कधींहि निर्माण होणे शक्य नाहीं. ग्रामवादानें कांहीं क्षेत्रांत महायंत्रें मंजूर केली आहेत. पण मुख्यतः अन्नवस्त्रासारख्या प्रत्यक्ष भोगवट्याच्या वस्तूंना महायंत्रांचा स्पर्श होता कामा नये असा त्याचा कटाक्ष आहे. असे जर खरोखरच झाले तर या राष्ट्रावर अत्यंत भयावह अशी आपत्ति ओढवेल. आजच्या जीवनाच्या किमान गरजा या दोनशे वर्षांपूर्वीच्या समाजाच्या किमान गरजांपेक्षां शंभर