पान:भारतीय लोकसत्ता.pdf/१८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१८८
भारतीय लोकसत्ता

करण होतें, स्पर्धा नव्हती आणि व्यक्तिविकासाला अवसर होता. आणि यामुळे खरीखुरी लोकशाही तेथें नांदत होती. 'फिलॉसफी ऑफ व्हिलेज मुव्हमेंट' या आपल्या लहानशा पुस्तकांत कुमाराप्पा यांनी या मताचा पुरस्कार केला आहे. अर्वाचीन काळच्या पाश्चात्य देशांतल्या सर्व लोकसत्ता त्याज्य ठरवून प्राचीन पद्धतीची लोकसत्ता आम्हांस निर्मावयाची आहे असें ते म्हणतात. हिंदुस्थानांतल्या जुन्या ग्रामव्यवस्थेचे गोडवे गाण्याची ही पद्धत सर्वत्रच रूढ झालेली आहे. केवळ गांधीवादी पंडितच ती ग्रामव्यवस्था आदर्श मानतात असें नसून सर्व पुराणाभिमानी पंडितांची तशी प्रवृत्ति आहे. रियासतकार सरदेसाई यानींहि आपल्या या जुन्या ग्रामरचनेची प्रशस्ति गाईली आहे. आणि त्याकाळी प्रत्येक गांव हे आपल्या हद्दीत एक प्रजासत्ताक राज्य होते असे मत दिले आहे. जुन्या ग्रामव्यवस्थेची प्रशस्ति म्हणजे या भरतभूमीवरची फार मोठी आपत्ति आहे असे माझे मत आहे. यापुढें भारतांत जी लोकसत्ता व्हावयाची तिच्यासाठी हा जुना आदर्श पुढे ठेवणें हें फारच घातक आहे. म्हणून या प्रशस्तीची चिकित्सा करणे अवश्य आहे.

प्राचीन ग्राम व लोकसत्ता

 या सर्व पंडितांच्या मतें या व्यवस्थेत असा कांहीं गुण होता की, या भूमीवर मागल्या काळांत शेकडो आक्रमणे झालीं, राज्यक्रांत्या झाल्या, उलथापालथी झाल्या तरी येथले शेतकरीजीवन त्या व्यवस्थेमुळे अभंगच्या अभंग राहिले. ह्रीं केवळ वरवरची वादळे होती. ती येत व जात; पण ही ग्रामव्यवस्था बिघडत नसे व तिच्या आश्रयाने रहाणारा शेतकरी हा अचल रहात असे. इतिहासदृष्टीने या मताचें परीक्षण करतां हा एक फार मोठा भ्रम आहे असें दिसून येईल. रियासतकार सरदेसाई यांच्याच इतिहासाच्या आधारे हे दाखवून देतां येईल. इ. स. १००० ते १६०० या काळांत भरतभूमीवर मुसलमानांची अनेक राज्ये होऊन गेली. त्यांचा इतिहास देऊन नंतर मुसलमानी अमलाचे त्यांनी पर्यालोचन केलें आहे. (मुसलमानी रियासत, भाग १ ला, प्रकरण १९ वें) त्यांत ते म्हणतात- या काळांत लाखो हिंदूंस मुसलमानानी बाटविलें, त्यांची देवळे फोडली, विद्यापीठांचा विध्वंस केला; जिझिया कर न देतां आल्यानें खालच्या