पान:भारतीय लोकसत्ता.pdf/१८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१८७
गांधीवाद व लोकसत्ता

 ग्रामवादासंबंध असे उद्गार का काढावेसे वाटतात तें सविस्तर सांगणें अवश्य आहेच. पण तत्पूर्वी या ग्रामवादाचें विवेचन करतांना आपल्या प्राचीन ग्रामव्यस्थेविषयीं जी एक श्रद्धा या पंडितांनीं प्रगट केली आहे तिचा विचार केला पाहिजे. कारण प्रत्यक्ष ग्रामवादापेक्षांहि ही श्रद्धा जास्त घातक व भयावह आहे. भरतभूमीतील प्राचीन ग्रामव्यवस्था या पंडितांनी आदर्श म्हणून पुढे ठेविली आहे. नवीन रचना अगदीं तंतोतंत त्या बरहुकूम होईल असें नाहीं. पण फरक असतील ते कालमानाप्रमाणे अवश्य असे किरकोळ स्वरूपाचे असतील; पण मूलतत्त्वे जीं अंगीकारावयाचीं तीं सर्व प्राचीन ग्रामव्यवस्थेत होतीं याबद्दल गांधीवादांत फारसें दुमत नाहीं. आणि यामुळेच मन निराशेने जास्त व्याप्त होते.

ग्रामगौरव

 पाश्चात्य भौतिक संस्कृतीचा महात्माजींना अत्यंत तिटकारा होता. व त्या संस्कृतीपासून खेडी अलिप्त आहेत म्हणून त्यांना समाधान वाटे. आपल्या खेड्यांत हजारों वर्षे तोच नांगर, तींच शेतींची अवजारे व तींच शेतकऱ्याची झोपडी आहे, यांत कसलाहि बदल झाला नाहीं, म्हणून राममोहन रॉयांपासून सर्व विचारवंतांना खेद वाटे. पण गांधीनी म्हणतात कीं तेंच खरें भरतभूमीचें भूषण आहे. त्यांच्या मतें आमच्या पूर्वजांना मोठी यंत्रे शोधण्याची ऐपत नव्हती असें नाहीं. पण या शेतीच्या नव्या यंत्रांनी लोक गुलाम होतील व नीतिहीन होतील हे जाणून त्यांनी ठरवून टाकिले कीं, हातापायांच्या शक्तींनी जेवढे काम होईल तेवढेच करणे श्रेयस्कर होय. या त्यांच्या धोरणामुळे आमचीं खेडी शुद्ध, नीतिमान् व अकलंकित अशीं राहिलेली आहेत. खरे स्वराज्य तेथेंच आहे. खरी संस्कृति तेथे नांदत आहे. असें सांगून गांधीजींनी असा निर्णय दिला आहे कीं, आमच्या शेतकऱ्याला अजून कोणीहि शस्त्रबलाने जिंकलेले नाहीं व कधीहि जिंकणे शक्य नाहीं. (हिंद स्वराज्य पृ. ४८)
 ग्रामोद्धार, ग्रामोद्योग यावरचें गांधीवादी विद्वानांचे वाङ्मय पाहिले तर एक गोष्ट स्पष्ट दिसून येते कीं या सर्वांच्या मतें आपल्याकडची पूर्वीची म्हणजे अठराव्या शतकापर्यंतची ग्रामरचना ही आदर्श होती. तींत विकेन्द्री-