पान:भारतीय लोकसत्ता.pdf/१८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१८६
भारतीय लोकसत्ता

वाटणार नाही असे ठेविले पाहिजे आणि आक्रमणाचा प्रतिकार नैतिक बळाने करून राष्ट्राचे रक्षण केले पाहिजे.
 ग्रामवादांतील तत्त्वांच्या आश्रयाने अशी समाजरचना झाली म्हणजे सर्व समाज सुखी होईल, व्यक्तीला आपल्या विकासाला सर्व दृष्टीने अवसर मिळून लोकशाहीची परिणति होत जाईल व त्याचाच अनिवार्य परिणाम म्हणजे जगांतून युद्धे व साम्राज्यशाही हीं नाहीशी होऊन अखिल मानवजात सुखी होऊन अध्यात्मबलसंपन्न होईल.
 ग्रामवादाची ही मूलतत्त्वे पाहिलीं, आणि कुमाराप्पा बंधु, मश्रुवाला इ. थोर समाजसेवकांचा त्यांना पाठिंबा आहे हें ध्यानी आले म्हणजे या भरतभूमीच्या भवितव्याविषय मन फार साशंक होतं. जगांत कधी काळी समृद्धि होईल आणि अखिल जनतेला पोटभर अन्न व अंगभर वस्त्र मिळेल अशी आशा कशाच्या जिवावर करतां येत असेल तर ती महायंत्रोत्पादनाच्या जिवावर करता येते. त्यालांच नेमका ग्रामवादाचा विरोध आहे. जन्मनिष्ठ व्यवसाय व तज्जन्य जातिभेद यांच्या कैचींतून आपण आतां सुटलों म्हणून निःश्वास टाकण्याची वेळ येते न येते तोच त्यांचा जीर्णोद्धार करण्याचा गांधीवादाने चंग बांधला आहे. प्रवृत्तिवादाची रग या भारतीयांच्या अंगांत जरा उमटेल व त्यांचे जीवन जरा कसदार व वरच्या पातळीचे होईल असा संभव दिसतो न दिसतो तोंच गरजा कमी करण्याचे व जगांत कोणालाहि आक्रमण करण्याइतके आकर्षक वाटू नये असे जीवन निर्माण करण्याचा उपदेश करणारे निवृत्तीचे तत्त्वज्ञान येथे हजर झाले आहे. मला वाटते फ्रेंचांना संघटित पक्ष बनविणे जितके अशक्य, जर्मनांना व्यक्तिस्वातंत्र्याची महती आकळणें जितकें असंभवनीय, तितकेंच भारतीयांना प्रवृत्ति, भौतिकनिष्ठा, ऐहिकता यांची आवड अंगीं बाणविणे अशक्य आहे. भारतीयांच्या रक्तांतला निवृत्तीचा रोग कधी काळी नष्ट होईल ही आशाच गांधीवाद वाचल्यानंतर नष्ट होते. आमची परलोकावर कायमची खिळलेली ती दृष्टि, आमच्या रक्तांतले ते दारिद्र्यप्रेम आणि आमची ती पुराणप्रियता ! यांतून आम्ही मुक्त होऊन नेटका प्रपंच करण्यास समर्थ होऊं असें वाटत नाहींसें होते.