पान:भारतीय लोकसत्ता.pdf/१८६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१८५
गांधीवाद व लोकसत्ता

 या तत्त्वांन्वयें समाजरचना झाली की, प्रत्येक ग्राम हा एक स्वयंपूर्ण घटक होईल. अगदी अक्षरशः एक ग्राम नाहीं तरी ५/१० ग्रामें (कोणाच्या मते एक तालुका) एका गटांत येतील आणि भारताच्या राष्ट्रीय जोवनाचा हा गट म्हणजे मूलघटक होईल. हा घटक स्वयंपूर्ण असलाच पाहिजे. यानें अन्न, वस्त्र, व इतर वस्तू या आपल्या परिसरांतच निर्माण केल्या पाहिजेत आणि शिक्षण, धनव्यवस्था, शासन या दृष्टींनी बहुतेक जीवन स्वयंपूर्ण करण्याचे प्रयत्न केले पाहिजेत.
 ग्रामवादांतील या तत्त्वांवर समाजरचना झाली की त्या भारतीय समाजाला पोलीस, सैन्य व शस्त्रसंभार यांची गरज रहाणार नाहीं. कारण अहिंसा हे त्याचे मुख्य बल होय. दरवडेखोरांचा अहिंसकपद्धतीने प्रतीकार करण्याचे शिक्षण घेतलेले दल प्रत्येक ठिकाणी सज्ज ठेवण्यांत येईल. शिवाय दरवडे पडूं लागलेच तर दरवडेखोरांच्या गांवीं आपल्या गांवांतील उत्तम माणसें पाठवावीं व आपल्या जरूरीपुरतें उत्पन्न कसे काढावें हे त्यांना शिकविण्याची व्यवस्था करावी म्हणजे पुन्हां दरवडे घालण्याची बुद्धि त्यांना होणार नाहीं. परकीय आक्रमणाचाहि विचार याचप्रमाणे करावा. मुख्य म्हणजे ग्रामवादाच्या तत्त्वावर संघटित झालेल्या समाजावर आक्रमण करावें अशी कोणच्याहि विदेशी सत्तेला इच्छाच होणार नाहीं, कारण आक्रमकांना कांहीं मिळणार नाहीं; ग्रामवासी कच्चामाल त्यांना विकणार नाहीत आणि त्यांचा माल घेणार नाहींत. तेव्हां बहुधा अशा समाजावर आक्रमणच होणार नाहीं आणि त्यांतून झालेच तर त्याचा सत्याग्रहानें प्रतीकार करणे हेच धोरण ठेवले पाहिजे. याचीं कारणें दोन. एक म्हणजे ग्रामोद्योगांत जे धन निर्माण होणार त्यांतून युद्धाला अवश्य असा अफाट शस्त्रसंभार व इतर साहित्य निर्माण करणे अशक्य आहे. महायंत्रोत्पादनालाच ते सामर्थ्य आहे, हातपद्धतीला नाहीं. आणि त्यांतूनहि महायंत्रोत्पादन करण्याचे ठरविले तर युद्धासाठी केन्द्रीय सरकाराला राष्ट्राच्या सर्व जीवनावर, म्हणजे उद्योगधंदे, शेती, उत्पादन, खप या सर्वांवर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार द्यावा लागेल, असे झाले म्हणजे केन्द्रीकरण झालेच; आणि ते तर सर्व अनर्थाचे मूळ आहे. म्हणून ग्रामवादाचा आश्रय करून आम्ही आपले आर्थिक जीवन परकीयांच्या लोभाला मुळींच आकर्षक