पान:भारतीय लोकसत्ता.pdf/१८५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१८४
भारतीय लोकसत्ता

उच्चनीचता ही गांधीवादी पंडितांच्या मतें प्राचीन काळी नव्हती. ती आल्यामुळे समाजाचा ऱ्हास झाला हे खरें, पण तेवढ्यामुळे जातिव्यवस्था त्याज्य ठरत नाहीं. ग्रामवादांत प्रत्येकाचा व्यवसाय त्याच्या जन्मावरूनच निश्चित होईल आणि कांही अपवाद वगळतां एका जातीचा धंदा दुसऱ्या जातीच्या माणसाला करता येणार नाहीं. चांभाराला विशेष बुद्धिमत्ता असली तरी त्याला प्राध्यापक होण्याची या व्यवस्थेत इच्छाच होणार नाहीं. कारण त्याच्या धंद्यांत त्याच्या बुद्धीला पुरेपूर अवसर मिळणारच आहे; आणि असें बंधन ठेवल्याने आर्थिक समतोलपणा बिघडणार नाहीं. (डॉ. कुमाराप्पा, पुंजीवाद, समाजवाद, ग्रामवाद. पृ. १८९) गांधीवादाचा आनुवंशिक गुणावर विश्वास आहे, त्यामुळे पित्याचाच धंदा पुत्रानें केला तर त्यांतील कला पुत्राला सहज हस्तगत होईल असे त्याचे मत आहे. जातिव्यवस्थेचा हा आणखी एक फायदा आहे. मात्र महात्माजींनीं आंतरजातीय व वर्णीय विवाहास मान्यता दिलेली आहे. असे विवाह झाल्यावर आनुवंशिक गुण कसे टिकणार हे कळणे कठीण आहे; पण गांधीवादाची तशी श्रद्धा आहे. कोणी याला जातिव्यवस्था म्हणतील, कोणी वर्णव्यवस्था हे भारदस्त नांव देतील; पण धंदा जन्मावरून ठरावा, म्हणजे स्पर्धा नष्ट होईल, अनुवंशिक गुणांचा फायदा मिळेल आणि समाज सुखी होईल असें मात्र सर्वांचेंच मत आहे.
 ग्रामवादाचा धन व सत्ता यांच्या केन्द्रीकरणाला विरोध असला, तरी भांडवलदार व जमीनदार यांना नष्ट करावे असे त्या पंथाचें मत नाहीं. या लोकांनीं आपणांस प्राप्त झालेले धन सार्वजनिक निक्षेप म्हणून संभाळावे आणि आपल्या जरुरीपुरता त्यांतील वाटा घेऊन बाकीच्या धनाचा समाजहितासाठी उपयोग करावा असे गांधीजींनी सांगितले आहे. जमीनदार, भांडवलदार यांनी असें करण्याची बुद्धि दाखविली नाहीं तर समाजाने संघटित लोकमताच्या जोरावर त्यांना तसें करण्यास भाग पाडावें; पण त्यांना अजिबात नष्ट करूं नये. कारण त्यांचे धन हिरावून घेतले तर ते समाजाचे कट्टे शत्रू बनतात, निक्षेप किंवा विश्वस्ततत्त्वानें तेच समाजाचे मित्र बनतील.