पान:भारतीय लोकसत्ता.pdf/१८४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१८३
गांधीवाद व लोकसत्ता

होतात. हिंदुस्थानांत माणूसबळ विपुल आहे. अशा स्थितींत येथे मोठीं यंत्रे आणून महायंत्रोत्पादन सुरू केले, तर तितक्याच मोठ्या प्रमाणावर बेकारी माजेल आणि बेकारीसारखी मोठी आपत्ति कोणती असणार ? तेव्हां या कारणासाठीं तरी केंद्रीकरण टाळणे अवश्य आहे. तें ग्रामोद्योगाच्या आश्रयानेंच टळेल. या ग्रामरचनेंत अगदी लहान लहान यंत्रे वापरली जातील आणि मोठया यंत्रावर पूर्ण बहिष्कार घातला जाईल. गांधीवादाचा मुख्य विरोध यंत्राला नसून यंत्रामुळे होणाऱ्या केंद्रीकरणाला आहे. कांहीं मोठी यंत्रे व त्यामुळे होणारें मोठ्या प्रमाणावरचें उत्पादन आणि त्यामुळे होणारे केंद्रीकरण हें अनिवार्य म्हणून गांधीवादानेंदि मान्य केले आहे. साधारणत: संरक्षणाचीं साधनें निर्माण करणारे कारखाने, विजेसारख्या शक्ति निर्माण करणारे कारखाने, यंत्रांचे कारखाने, रसायनाचे कारखाने हे मोठया प्रमाणावरच चालविले पाहिजेत; पण मनुष्याच्या प्रत्यक्ष भोगवट्याच्या वस्तू मात्र विकेंद्रपद्धतीनेंच निर्मिल्या पाहिजेत. (सर्वोदयकृत पुनर्घटनेचा आराखडा. भारतज्योति १५-१-५०) अ. भा. ग्रामोद्योग संघाची ७/४/५० ला जी परिषद भरली होती तिनें असा ठराव संमत केला आहे कीं, यापुढे सरकारनें हळूहळू असे धोरण ठेवावें की, चरख्याला जास्तीत जास्त पाठिंबा देऊन गिरण्या बंद करावयाच्या. तेलघाण्याचा प्रसार करून तेलाचे कारखाने बंद करीत आणावयाचे. कागद, गूळ, कातड्याच्या वस्तू याहि बाबतीत हेच धोरण अवलंबावे. हातपद्धतीनें यांचे उत्पादन वाढवीत नेऊन शेवटी यंत्रपद्धति नष्ट करावी आणि पुढे तिला कायद्याने बंदी करावी. कारण महायंत्रोत्पादनाची स्पर्धा सुरू झाली, कीं विकेंद्रपद्धतीनें चालणारे व्यवसाय कधींहि टिकणें शक्य नाहीं. तेव्हां अन्न, वस्त्र, कागद, गूळ, चामडी इ. प्रत्यक्ष भोगवटयाच्या वस्तू महायंत्रपद्धतीने निर्माण करण्यास कायद्यानेंच बंदी केली पाहिजे,
जातिभेदसमर्थन
 भांडवलशाही समाजरचनेंत स्पर्धा हे अत्यंत घातक असे तत्त्व आहे. गांधीवाद स्पर्धातत्त्व सोडून सहकार्यांचा अवलंब करतो आणि त्या दृष्टीने हिंदुस्थानांतील जुनी जातिव्यवस्था ही आदर्श मानतो. जातिव्यवस्थेतील