पान:भारतीय लोकसत्ता.pdf/१८३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१८२
भारतीय लोकसत्ता

कोणी संघटित झालेले पांचपन्नास लोक. पूर्वी कारखाना कंपनीच्या ताब्यांत असे. आतां सरकारच्या ताब्यांत जाणार. पण यांत फरक कांहींच होत नाहीं. कारण ते कंपनीचे चालक हातीं धन केन्द्रित होतांच जसें जनतेचें शोषण करीत, तसेंच शोषण सरकार करील. तें करणार नाहीं, याला हमी कांहींच नाहीं. रशियांत आज हेंच होत आहे. त्यामुळे समाजवादामध्ये धन व सत्ता ही एका अल्पसंख्य गटाच्या हाती जाणे हे टळत नाहींच. अर्थात् यामुळे लोकशाहींचा नाश, दंडसत्तेचा उद्भव हाहि टळत नाहीं; म्हणून महायंत्रोत्पादन हेच मुळांत नाहींसे केले पाहिजे; यामुळे सर्व प्रकारचें केंद्रीकरण नष्ट होऊन तज्जन्य सर्व आपत्तीहि टळतील. तेव्हां समाजाचा मूल घटक ग्राम हाच धरावा आणि तेथें चरखा, तेलघाणा, साधा नांगर अशा साध्या हत्यारांनीच उत्पादन करावें या साध्या हत्यारांत विज्ञानाच्या साह्यानें वाटेल त्या सुधारणा करण्यास हरकत नाहीं; पण त्यांचे अल्परूप मात्र कशानेंहि जातां कामा नये. कारण सामान्य व्यक्तींना, जनतेला अवाढव्य यंत्रावर मालकी ठेवतां येत नाहीं. यंत्रे व उत्पादन अल्परूप राहिलीं म्हणजे तीं सामान्य जनांच्या ताब्यांत रहातील व उत्पादनाचें पूर्णपणे विकेंद्रीकरण होईल. आतां यायोगे आजच्या प्रमाणावर धननिर्मिति होणार नाहीं हें खरें. ज्या वस्तू मिळतील त्या पुष्कळशा जाड्या भरड्या मिळतील. पण जनतेला त्यावर संतुष्ट रहाण्याचेच शिक्षण दिले पाहिजे. कारण मानवाचें सुख, त्यांच्या आत्म्याचा विकास, व खरी लोकसत्ता हें आपले मुख्य साध्य आहे. प्रचंड धनोत्पादन केले, की केंद्रीकरण अपरिहार्य होते आणि मग जनतेचें शोषण, इतर देशांवर आक्रमण, अमानुष स्पर्धा, संहारक युद्धे आणि जगाचा प्रलय या भांडवलशाहीच्या सर्व आपत्तीहि अटळ होतात. म्हणून विपुल धनाचा मोह माणसाने सोडला पाहिजे. जाड्याभरड्या अल्पधनांत संतोष मानला पाहिजे. मनोविकास, बौद्धिक प्रगति, आत्मिक उन्नति, बहुजनांचे कल्याण यांना खरें महत्त्व आहे. ते विकेंद्रीकरणांत साधत असल्यामुळे मनुष्याने साध्या रहाणीस तयार झाले पाहिजे.
 विकेंद्रीकरणाच्या या पद्धतीने यंत्रामुळे निर्माण होणारी बेकारीची आपत्तीहि टळते. शंभर विणकरांचे काम एक यंत्र करते; त्यामुळे ते यंत्र चालविण्यास जीं चारपांच माणस लागतात, ती सोडून बाकीचीं ९०-९५ बेकार