पान:भारतीय लोकसत्ता.pdf/१८२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१८१
गांधीवाद व लोकसत्ता


केन्द्रीकरण

 भांडवलशाही ही जगावरची एक घोर आपत्ति आहे आणि तिच्यांतील मूलतत्त्वांचाच अवलंब यापुढे आपण करीत राहिलो, तर जगाचा लवकरच प्रलय होईल, हे मत जगांतील बहुतेक विचारवंतांना आतां मान्य झालें आहे; पण त्याबरोबर जगाचें यापुढे तारण होईल तें समाजवादाच्या आश्रयानें होईल, हेंहि दुसरे मत तितकेंच सर्वमान्य झालेलें आहे; पण गांधीवादी कार्यकर्त्यांची व पंडितांची समाजवादावर अशी श्रद्धा नाहीं. त्यांना समाजवाद हा मुळींच तारक वाटत नाहीं. उलट एकापरी तो भांडवलवादापेक्षांहि जास्त मारक आहे, असे त्यांचे मत आहे आणि म्हणूनच समाजवादाला विरोध करून त्यांनीं ग्रामवादाचा पुरस्कार केला आहे. तेव्हां या पंडितांचे समाजवादावर आक्षेप काय आहेत, ते प्रथम समजावून घेऊन नंतर त्यांनी आपल्या तत्त्वज्ञानाचे जे मूलभूत सिद्धांत सांगितले आहेत, त्यांचा परिचय करून घेऊं. म्हणजे त्यांचा परामर्ष घेणें सुलभ होईल.
 आजची भांडवलशाही ही अवाढव्य यंत्रांच्या साह्याने प्रचंड प्रमाणावर धनोत्पादन करते आणि त्या धनाच्या बळावर सर्व सत्ता आपल्या हाती घेऊन समाजाचें अनेक तऱ्हांनी शोषण करते, हा भांडवलशाहीतला मुख्य दोष आहे. म्हणजे प्रथम धनाचें व मग त्या जोरावर ती सत्तेचें केंद्रीकरण करते आणि यामुळेच सर्वनाश होतो. हा दोष जाणून समाजवादी पंडितांनी, भांडवलदारांच्या हातून धनोत्पादनाची साधने काढून घ्यावी व तीं जनतेच्या म्हणजेच सरकारच्या स्वाधीन करावीं, म्हणजे धनाचे व सत्तेचें केन्द्रीकरण होणार नाहीं, असा उपाय सुचविला; पण प्रचंड यंत्रे व त्यांच्या साह्याने होणारे प्रचंड प्रमाणावरील उत्पादन याला त्यांचा विरोध नाहीं. इतकेच नव्हे तर हे महायंत्रोत्पादन अवश्य आहे, असें त्यांचें मत आहे आणि यालाच गांधीवादाचा विरोध आहे. त्याचे म्हणणे असें कीं, एकदां महायंत्रोत्पादन आपण स्वीकारलें, कीं धनाचें व त्यामुळे सत्तेचें केन्द्रीकरण होणारच. भांडवलदारांच्या हातून तुम्ही उत्पादनसाधनें काढून घेऊन ती सरकारच्या हाती देणार. पण सरकार म्हणजे कोण ? असेच