पान:भारतीय लोकसत्ता.pdf/१८१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१८०
भारतीय लोकसत्ता

त्तत्त्वान्वयें समाजरचना केली तरच भारतांत खरीखुरी लोकशाही प्रस्थापित होईल असा गांधीवादी पंडितांचा सिद्धांत आहे; म्हणून त्या ग्रामवादाचें परीक्षण करणे अवश्य आहे.
 'ग्रामवाद' हा शब्द स्वतः गांधीजींनी वापरलेला नाहीं. ग्रामोद्धार, ग्रामसंघटना, ग्रामोद्योग इत्यादि शब्द ते वापरीत; पण यांतील कल्पनांचें प्रतिपादन करतांना आपल्या पन्नास वर्षांच्या कारकीर्दीत त्यांनी जे अनेक विचार मांडले, समानरचनेच्या मूलतत्त्वांविषयों जे अनेक सिद्धांत सांगितले, जे वादविवाद केले, पृच्छकांच्या प्रश्नांना उत्तर दिलीं व आपल्या बुद्धिनिश्चयाप्रमाणे जे कार्य केले त्यांतून अखिल जीवनासंबंधी एक व्यापक असें तत्त्वज्ञान निर्माण झाले आहे आणि त्यालाच गांधीवादी पंडितांपैकीं विख्यात असें डॉ. भारतन् कुमाराप्पा यांनीं 'ग्रामवाद' असे नांव दिले आहे. 'पुंजीवाद, समाजवाद व 'ग्रामवाद' या आपल्या पुस्तकांत त्यांनी त्याचें सविस्तर विवेचनहि केले आहे. स्वतः गांधीजींनी 'ग्रामवाद' हा शब्द वापरला नसला तरी या वादांतील सर्वसिद्धांत व मते त्यांचींच आहेत. त्यांच्या आधारानेच कुमाराप्पांनी सर्व विवेचन केले आहे आणि त्या पुस्तकाला गांधीजींनीं जी प्रस्तावना लिहिली आहे, तींत ग्रामवादाचा गौरव करून, 'जगाचा व हिंदुस्थानचा अंतिम विनाश या ग्रामवादानेंच टळेल, कारण तो सत्यअहिंसेवर अधिष्ठित आहे.' असे आपले मत दिले आहे. या लेखांत जें विवेचन होईल ते बरेचसे त्या पुस्तकाच्या आधारें होईल. गांधीजींचीं इतर लेखांतील मतें मी उद्धृत करीनच; त्याशिवाय गांधीवादाचे इतर जे थोर पुरस्कर्ते त्यांच्याहि लेखनाचा विचार केला जाईल.प्रा. जे. सी. कुमाराप्पा, मश्रुवाला, विनोबा भावे, सर्वोदय समाजाचे इतर अनुयायी, शंकरराव देव या अनेक विचारवंतांनीं जे विचार वेळोवेळी प्रकट केले, त्यांचाहि परामर्ष घेतला जाईल. गांधीवादाचे हे सर्व एकनिष्ठ पुरस्कर्ते आहेत, आणि त्या वादान्वयें जर आपल्या समाजाची पुनर्घटना व्हावयाची असली, तर ती हे पंडित त्याला जें रूप देतील त्यावरून व्हावयाची आहे. म्हणून गांधीवादांतील ग्रामवाद हें जें प्रधान तत्त्वज्ञान त्याचे विवेचन करतांना या सर्व विद्वानांच्या विचारांचें सारसंकलन करून तें आधाराला घेणे हे युक्तच होईल.