पान:भारतीय लोकसत्ता.pdf/१८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१७
प्राचीन भारतांतील लोकसत्ता

जी समता ती भारतीय गणराज्यांत केव्हांहि नव्हती असे म्हणावें लागतें, तशी ती नव्हती हें डॉ. आळतेकरांनाहि मान्य आहे; पण आपल्या आजच्या मापाने त्या गणराज्याचे मापन करूं नये, असे ते म्हणतात... (नवभारत फे. १९४९) हे म्हणणे सयुक्तिकच आहे. पण तसे मान्य करूनहि त्या गणराज्यांचे मूल्यमापन करतांना त्यांच्या केवळ बाह्यरूपावरून तीं राज्य प्रजासत्ताक होती असे म्हणणे योग्य होणार नाहीं. लोकशाहीच्या मूलभूत सिद्धान्तांचा कस त्यांना लावलाच पाहिजे. तो लावून पाहतां हें जन्मनिष्ठ विषमतेचे वैगुण्य त्यांत दिसून येते हे आपण मान्य केले पाहिजे.
 गौतम बुद्धाने जातिभेद संपूर्ण नष्ट केले होते आणि शंकराचार्यांनीं पुन्हां ते प्रस्थापित केले, असा एक प्रवाद आहे. बुद्धानें जातिभेदाविरुद्ध उपदेश केला होता हें खरें आहे. जाति या जन्मावरून न ठरवितां गुणकर्मावरून ठरवाव्या असें त्याचें मत होते. सुत्तनिपात व मंझिमनिकाय या बौद्धग्रंथांत याविषयीं कांहीं कथा व गौतमाचीं कांहीं वचनें सांपडतात. प्रत्यक्ष श्रमणांच्या संघांत जातिभेदाला थारा नव्हता. चांडाळ, भंगी यांनाहि संघांत प्रवेश असल्याचे उल्लेख सांपडतात; पण याला जातिभेद नष्ट करण्याच्या दृष्टीने फारच थोडा अर्थ आहे. या सर्वांचा विचार करून, "बुद्ध व त्याचे शिष्य यांना जातिभेद नष्ट करण्याच्या कामी मुळींच यश आलें नाहीं, ते कृत्य त्यांच्या आवाक्याबाहेरचे होते," असा निर्णय प्रा. धर्मानंद कोसांबी यांनी आपल्या बुद्धचरित्रांत दिला आहे. (भगवान् बुद्ध- उत्तरार्ध पृ. ८८). शिवाय आणखी एक गोष्ट ध्यानांत ठेवली पाहिजे कीं, धर्मसंघांत सर्वांना सारखें लेखणं निराळें आणि मिश्रविवाह मान्य करून नातिभेद मोडणे निराळें. दिव्य अवदानांतील एक श्लोक प्रा. कोसांबी यांनी दिला आहे. त्यांत 'मुलाच्या व मुलीच्या लग्नांत जातीचा विचार करणे योग्य आहे, धार्मिक बाबतींत जातीचा विचार करण्याचे कारण नाहीं' असे म्हटले आहे. (आवाह काले च विवाहकाले, जातेः परीक्षा न तु धर्मकाले । उक्त ग्रंथ पृ. ९०) यावरून बौद्धधर्माला जातिभेद मोडण्यांत कितपत यश आले तें कळून येईल.

 भा. लो.....२