पान:भारतीय लोकसत्ता.pdf/१७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१६
भारतीय लोकसत्ता

श्रेष्ठता नष्ट करून रोमने सत्तेचे केन्द्र धनिकांना खुले केलें व यामुळे शासन संस्थेत लोकसत्तेची पहिली पाचर बसली,' असे मॅक् आयव्हर या पंडितानें म्हटलें आहे ते याच अर्थानें. (मॉडर्न स्टेट पृ. ९३). सोलन वगैरे ग्रीक नेत्यांनी आपल्या देशांत हेंच घडविलें. त्यांनी धनाच्या प्रमाणांवर लोकांचे चार वर्ग पाडले. प्रारंभी यांतील पहिल्या वर्गाच्या हाती सत्ता आली; पण वरचेवर नवे कायदे करून सोलनने अगदीं कनिष्ठ अशा चवथ्या वर्गाच्याहि हाती सत्ता देण्याचा उपक्रम केला. पुढे पुढे त्या वर्गातले न्यायाधीशहि नेमले जाऊं लागले.
 जातीय विषमता अशा रीतीने नष्ट करून तिच्या जागी आलेली आर्थिक विषमताहि पुढे ग्रीकांनी नष्ट करीत आणली होती. त्यांनीं सरकारच्या ताब्यांतील जमिनी निर्धन लोकांना वांटून दिल्या. कर्जापायी गुलाम झालेल्या लोकांची कर्जे कायद्यानें रद्द केली. गहाण जमिनी मोकळ्या करून त्या लोकांना वांटून दिल्या, कनिष्ठ वर्गावर कराचे ओझें सर्वात कमी व वरच्या वर्गांवर कर जास्त अशी योजना अमलांत आणली. आणि अशा रीतीनें सुखसाधनें व संधि यांची योग्य वांटणी करून लोकसत्तेचा पाया घातला. विल्डयूरांट म्हणतो कीं ग्रीसवर परशियाचे आक्रमण आले त्या वेळीं तेथे 'कसेल त्याची जमीन' व 'लोकनियंत्रित शासन' या गोष्टी सिद्ध होऊन गेल्या होत्या. (लाइफ ऑफ ग्रीस. पृ. १२६). जातीय व आर्थिक या दोन्ही विषमता अशा तऱ्हेनें नाहींशा झाल्यामुळे सर्वांना सारखा कायदा लागू करणे ही गोष्ट ग्रीसमध्ये सुलभ झाली होती. सोलन याचीं शासनें गरीब-श्रीमंत सर्वाना म्हणजे सर्व नागरिकांना सारखींच लागूं होतीं. आतां तेथे नागरिक व गुलाम असा भेद होता आणि त्यांना कायदाहि भिन्न होता; पण गुलामाला नागरीक होण्याची शक्यता होती. कर्ज निवारणे, धन्याची मर्जी प्रसन्न करून घेणे किंवा इतर कांहीं कर्तृत्व प्रगट करणे या मार्गांनीं गुलाम आपली गुलामगिरी नष्ट करूं शकत होता. हे हिंदुस्थानांत चातुर्वर्ण्यामुळे कधींहि शक्य नव्हते. चांडाल हा ब्राह्मणक्षत्रियांची बरोबरी करणे हे येथे कालत्रयीं शक्य नव्हतें. ब्राह्मण व शूद्र यांना कायदे निराळे होते आणि शूद्राला आपली जात बदलणे व ब्राह्मणाची किंवा क्षत्रियाची प्रतिष्ठा मिळविणें येथें अशक्य होते. म्हणूनच लोकसत्तेला आधारभूत अशी