पान:भारतीय लोकसत्ता.pdf/१७८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१७७
गांधीवाद व लोकसत्ता

विषाचे अनेक उतारेहि त्यांच्याच तत्त्वज्ञानांत त्यांनी निमाण करून ठेवले आहेत. स्वतःला अंतर्ज्ञानाचे अधिकारी असें जे म्हणवितात, त्यांचे व्यक्ति व समाज यांच्या संबंधाविषयीचे मत दंडसत्तेच्या पुरस्कर्त्याप्रमाणेच असते. समाज, राष्ट्र हा एक स्वतंत्र पुरुष आहे. त्याचें हिताहित स्वतंत्र आहे. केवळ सर्व व्यक्तींच्या हितांची बेरीज म्हणजे समाजपुरुषाचें हित, असें नाहीं. आणि म्हणूनच व्यक्ति ही समाजासाठी आहे, व्यक्तिजीवन हें स्वतंत्र अंतिम होऊं शकत नाहीं, समाज पुरुषाचा एक अवयव हेंच व्यक्तीचें स्थान, अशी त्यांची विचारप्रणाली असते. या विचारसरणीनें लोकशाहीचा पायाच उखडला जातो. कारण व्यक्तीचे स्वतंत्र अस्तित्व ती मान्य करीत नाही. महात्माजी अंतःसंवेदनावादी आहेत, जन्मनिष्ठ वर्णव्यवस्था, व केव्हांकेव्हां जातिव्यवस्थाहि ते मान्य करतात, परमार्थातील गुरूची महती त्यांना मंजूर आहे, आणि तरीसुद्धां व्यक्ति व समाज यांच्या संबंधाविषयींचे वरील मत त्यांना मुळींच मान्य नाहीं. समाजाचा मूल पाया म्हणजे व्यक्ति हाच होय. व्यक्ति ही कोणाची घटक किंवा अवयव नसून स्वतः पूर्ण आहे, अंतिम आहे, तिचा गुणविकास, तिचे हित हेच समाजरचनेचें ध्येय आहे, लोकांचें स्वराज्य म्हणजे व्यक्तींच्या स्वराज्याचा समवाय होय, अशा तऱ्हेचीं क्रांतिकारी, व्यक्तिवादाला पोषक अशींच तत्त्वे त्यांनी पुरस्कारिली आहेत. याचा अर्थ असा होतो की, गांधीजी हे हाडाचे क्रांतिकारक व व्यक्तिवादी होते; पण सनातन धर्माचे अत्यंत प्रबल संस्कार त्यांच्या मनावर झाले असल्यामुळे त्या क्रांतिवृत्तीवर व व्यक्तिवादावरील निष्ठेवर केव्हांकेव्हां आध्यात्मिकतेचें, परंपराप्रेमाचें व त्यामुळेच स्थितिवादित्वाचें घन पटल येऊन बसे. आणि त्या अध्यात्मनिष्ठेच्या व परंपरेच्या आहारी गेल्यावर ते जीं मतें व्यक्त करीत, तीं इतकीं चमत्कारिक व विपरीत असत कीं, त्यांच्या आधारें प्रतिपक्षीयांनीं त्यांच्यावर वाटेल ते आरोप करावे. मिश्रविवाह व मिश्रभोजन यांची बंदी आत्म्याच्या विकासाला अवश्य आहे, असेंच गांधीजींनी म्हटल्यावर (यंग इंडिया ६- १०- २१) लोकांनी तरी काय करावे ? एका थोर गांधीवादी पंडिताशी चर्चा करीत असतांना त्यांनी मला असें सांगितले की, 'महात्माजींवर तुम्ही वाटेल ते आरोप करा. आणि ते सिद्ध करण्यासाठी जीं वचनें
 भा. लो.... १२