पान:भारतीय लोकसत्ता.pdf/१७७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१७६
भारतीय लोकसत्ता

होते ते पुरुष प्रमादरहित असतात, या अत्यंत घातक मतावरहि त्यांची श्रद्धा होती. (यंग इंडिया ११-१०-२८) आणि इतके असूनहि प्रत्येक व्यक्तीच्या व्यक्तित्वाला सारखाच मान द्यावा असा त्यांचा आग्रह होता. इतकेच नव्हे तर सामान्य जनांच्या व्यक्तित्वावर, बुद्धिस्वातंत्र्यावर, वैयक्तिक आकांक्षाच्या न्याय्यतेवर बुद्धिवादाचा जसा पराकाष्ठेचा दृढ विश्वास असतो, तसाच त्यांचा होता. कधीं कधीं तर अराजक वाद्याप्रमाणे दुसऱ्या धृवाला जाऊनहि या बाबतीत ते प्रतिपादन करीत. 'शासनसंस्था कितीहि शुद्ध असली तरी ती लोकांच्या व्यक्तित्वावर आक्रमण करतेच. त्यामुळे तिच्या सत्तेची वाढ होणे धोक्याचे आहे. कारण व्यक्तित्व हेच सर्व प्रगतीचें मूल कारण आहे' असे त्यांनी म्हटले आहे. विकेन्द्रीकरणाठी ते अट्टाहास करीत, त्याचें एक प्रबल कारण हेच होतें. दिल्लीहून अखिल भारताचा जो राज्यकारभार चालतो, त्यांत सामान्य जनांना कांहींच गम्य नसते. हल्लीचें गुंतागुंतीचे आर्थिक, सामाजिक व आंतरराष्ट्रीय व्यवहार सामान्य जनांच्या आटोक्यापलीकडचे आहेत; त्यामुळे त्यावर नियंत्रण ठेवणे त्यांना मुळींच शक्य नाहीं. म्हणून ते व्यवहार ज्यांत अवश्य होतात ती समाजाची घडीच बदलावी आणि या सर्व व्यवहाराचे व सत्तेचेंहि विकेन्द्रीकरण करून सामाजिक प्रपंचाचा सर्व व्यवहार सामान्य जनांच्या आकलनांत आणून ठेवील अशीच समाजव्यवस्था रचावी असे त्यांचे मत होतें. (सर्व समाजप्रपंच सामान्य जनांच्या आकलनांत आणून ठेवण्याचा आग्रह धरणाऱ्या पुरुषाने त्या सामान्य जनांना सर्वस्वी अनाकलनीय व दुष्प्राप्य अशा अंतर्ज्ञानाची मात्र तरफदारी करावी हें किती विपरीत व विसंगत आहे ! पण तें आहे.) आतां तें कितपत व्यवहार्य होते व त्या समाजरचनेमुळे अंतीं राष्ट्राचें काय झाले असते हे प्रश्न निराळे. वरील मत उद्धृत करण्याचा हेतु एवढाच की सामान्य जन, त्यांचे हक्क व त्यांचे व्यक्तित्व यावरची महात्माजींची श्रद्धा अगदी अढळ होती हें दाखवावे. ही श्रद्धा लोकशाहीला अत्यंत पोषक आहे. लोकशाहीचा तो मुळारंभच होय.
 अंतःसंवेदनेवरील श्रद्धा व एकंदर अध्यात्मनिष्ठा ही कोणच्याहि स्वरूपांत समाजाला हानिकारक होणारच; पण महात्माजींची ती श्रद्धा जुन्या काळच्या धर्मगुरूंच्या श्रद्धेइतकी हानिकारक झाली नाहीं. याचे कारण हें कीं, या