पान:भारतीय लोकसत्ता.pdf/१७९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१७८
भारतीय लोकसत्ता

अवश्य तीं तुम्हांला सांपडत नसतील तर मी त्यांच्या लिखाणांतून काढून देईन; पण असें असूनहि मी तुम्हांला सांगतों कीं, 'गांधीजीवनाचा तुम्हीं सांगोपांग अभ्यास केलात तर गांधीजींच्यावर एकहि अश्लाघ्य आरोप तुम्हांला करता येणार नाहीं.' या म्हणण्यांत पुष्कळच तथ्यांश आहे. टिळकांच्यावर येणाऱ्या प्रतिगामित्वाच्या आरोपांचा विचार करतांना मीं याचे थोडेसे विवेचन केले आहे. कोट्यवधि सामान्य जनांना जो जागृत करतो, त्यांच्या ठायीं प्रतिकारशक्ति निर्माण करतो, त्यांच्या अहंकारास चेतना देऊन वाटेल त्या सुलतानी सत्तेशीं मी लढू शकेन, हा आत्मविश्वास त्यांच्या ठायीं जो निर्माण करतो, त्याच्याएवढा मानव जातीचा व लोकशाहीचा मोठा उपकारकर्ता दुसरा कोणी नाहीं. कारण भांडवलशाही, वर्ण-व्यवस्था, धर्मगुरूंचे प्रभुत्व असल्या विषम व्यवस्थेचा व तिच्यामुळे होणाऱ्या अन्यायाचा, जुलमाचा निःपात करण्याचें अत्यंत प्रभावी साधनच त्याने जनतेच्या हाती देऊन ठेवलेले असते. आतां हे करूनहि त्या जुलमी संस्थांचा त्याने पुरस्कार केला तर परंपरेच्या अभिमानामुळे, कांही जुन्या निष्ठांच्या वर्चस्वामुळे किंवा चुकीच्या विचारसरणीमुळे ही विसंगति निर्माण झाली आहे, असे समजून आपण त्याच्या कार्याचे मूल्यमापन करणे अवश्य आहे. तसें न केले तर त्यांत समाजाची अतिशय हानि आहे. कारण टिळक, गांधी असल्या महाशक्ति निर्माण होऊनहि समाजाच्या या प्रवृत्तीमुळे समाज त्यांना आंचवून बसेल.

गांधीवाद व गांधीजीवनकार्य

 वरील विवेचन करतांना गांधीवाद व गांधीजीवनकार्य अशी विभागणी केली आहे. ही विभागणी अगदीं तर्कशुद्ध आहे असें नाहीं व समाधानकारक आहे असेंहि नाहीं. कारण गांधीवाद म्हणून जो तात्त्विक सिद्धांतसमूह आहे, त्यांतील कांहीं तत्त्वे लोकशाहीला अगदीं घातक आहेत, तर त्याशी विसंगत असलेली कांहीं तत्त्वें तिला पोषक आहेत. जीवनकार्यातहि असेंच दिसर्ते आणि त्यामुळेच महात्माजींच्या कार्याचे मूल्यमापन करतांना अभ्यासक हतबुद्ध होतो असें मीं आरंभी म्हटले आहे. स्थूल मानानें पहातां वरील विभागणीमुळे विवेचन करणे सुलभ होतें, मनांतील अभिप्राय बऱ्याचश