पान:भारतीय लोकसत्ता.pdf/१७६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१७५
गांधीवाद व लोकसत्ता

म्हणावेंसें वाटतें. अध्यात्मनिष्ठेतले त्यांचे जे सिद्धान्त होते त्यांतून निघणारी क्रमप्राप्त व अटळ अशीं जीं निगमनें तींहि त्यांनी पावलोपावलीं स्वीकारली असती, त्यांचाहि प्रत्येक वेळीं अवलंब केला असता व आग्रह धरला असता तर गांधी ही महाशक्ति अगदीच वांया गेली असती; पण त्या क्रमप्राप्त निगमनांना महात्माजींनीं थारा दिला नाहीं, असेंहि कधीं कधीं घडलेले आहे; आणि त्या निगमनांशी अत्यंत विसंगत व म्हणूनच लोकशाहीला उपकारक असे अनेक सिद्धान्तहि त्यांनी सांगितले आहेत. अनेक श्रद्धा मनाशीं बाळगल्या आहेत व अनेक कृतीहि केल्या आहेत; त्यामुळे परिणामतः ही महाशक्ति लोकशाहीला उपकारकच झालेली आहे. सनातन धर्मावरील दृढश्रद्धेमुळे टिळकांच्या मनांत अनेक श्रद्धा अशा होत्या कीं, त्यांचा अलगपणे विचार केला तर त्या निश्चितपणे प्रतिगामी वाटाव्या; पण तेवढ्यामुळे त्यांच्या कार्याचा मूलौघ आपण जाणून न घेतां त्याचा अधिक्षेप केला तर त्यांत आपलाच घात आहे हे मागें सांगितले आहे. महात्माजींच्या कार्याचे मूल्यमापन करतांना हीच दृष्टि ठेवणे अवश्य आहे. महात्माजींच्या बाबतींत हे काम जास्त दुष्कर आहे हे खरें; पण ते केले नाहीं तर एक महाशक्ति येथें संचरून गेली पण आपण करंटेपणानें तिला आंचवलों असें होईल.
 अंतःसंवेदना ही शक्ति आपल्या ठायीं आहे, असे ज्यांना वाटते ते तिच्या जोरावर समानावर अनियंत्रित अधिकार गाजवूं पहातात. मागल्या धर्मपीठांनी हेच केले आहे आणि अंतःसंवेदना ही परमेश्वरी प्रेरणा मानली तर ते सयुक्तिकच आहे. बुद्धि, तर्क यापलीकडे ज्यांची धांव जात नाहीं त्यांनीं सर्वज्ञ अशा परमेश्वरीवाणीपुढे नमलेच पाहिजे, हें बुद्धीला पटण्याजोगे आहे. शब्दप्रामाण्य किंवा वेदप्रामाण्य तें हेंच आणि तेंच लोकशाहीच्या नाशाला कारण होतें. कारण ही ईश्वरी प्रेरणा लाखांतून एखाद्यालाच वश असते. बुद्धि, तर्क ही शक्ति अल्प खरी; पण अल्पप्रमाणांत का होईना ती प्रत्येक मानवाला प्राप्त होऊं शकते आणि म्हणूनच ती समतेला पोषक होते. अंतःसंवेदना ही अलौकिक महापुरुषानांच प्राप्त होते, सामान्यांना ती कालत्रयीं प्रसन्न होणार नाहीं. महात्माजींना हें मत मान्य आहे. अंतर्ज्ञान ज्यांना