पान:भारतीय लोकसत्ता.pdf/१७५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१७४
भारतीय लोकसत्ता

लढा पहिल्याच दिवशी काँग्रेसच्या हातून गेला नसता व हा खरा महात्माजींचा लढा नव्हे असे सांगून आपल्याच लोकांना दुखविण्याची पाळी आली नसती. बार्डोलीचा लढा महात्माजींनीं अंतःसंवेदनेच्या प्रेरणेमुळे स्थगित केला. त्यामुळे काँग्रेसचा लढाऊ कार्यक्रम संपला. आणि म्हणून पंडित मोतीलाल, चित्तरंजन दास हे लढाऊ वीरहि फुटून निघाले. ४२ च्या लढ्याच्या आध्यात्मिक पूर्व तयारीमुळे सोशॅलिस्टांना फुटावे लागलें. या लढ्यासाठी अखिल भारतीय संघटना उभारली असती तर वरील आपत्ति तर टळली असतीच; पण शिवाय त्या लढ्याच्या योजनेने लोकांना कार्यक्षमता, कुशाग्रता, इ. गुणांचं बाळकडू मिळाले असते. पण ज्ञान, बुद्धि यांची जशी गांधीवादाला आस्था वाटत नाही त्याचप्रमाणे योजना, संघटना, आंखणी यांची वाटत नाहीं. नानासाहेब हर्डीकरांनी उभारलेल्या काँग्रेससेवादलाची काँग्रेस नेत्यांनी कशी उपेक्षा केली व असली संघटना गांधीवादांत बसत नाहीं, हा घातक विचार ते कसे घरून बसले हे पाहिले, म्हणजे गांधीवादांतील अध्यात्मनिष्ठेने भारतीय लोकसत्तेची किती हानि झाली आहे याची सम्यक् कल्पना येईल.

कल्याणकारक विसंगति

 गांधीवादांतील अध्यात्मनिष्ठा, नित्यहस्तक्षेप करणारा परमेश्वर, आत्मबल, अंतःसंवेदना आणि सद्भावनेने केलेल्या प्रमादामुळे अहित होत नाहीं ही श्रद्धा ही लोकशाहीला सर्वस्वीं मूले कुठार: सारखी कशी होते त्याचा विचार येथवर केला; पण आरंभी म्हटल्याप्रमाणे तेवढयावरून महात्माजींच्या कार्यासंबंधी एकदम निर्णय करणे हा मोठाच प्रमाद होईल. कारण या त्यांच्या विविध श्रद्धांशी अगदी विसंगत असेहि अनेक सिद्धान्त त्यांनीं सांगितले आहेत व त्याप्रमाणे आचरणहि केले आहे. मार्क्सविषयीं विवेचन करतांना एका लेखकानें म्हटले आहे कीं, त्याच्या प्रतिपादनांत विसंगति होती म्हणूनच जगाचें हित झाले आहे. मला हे खरे वाटते. मार्क्स ही आजच्या जगांतली एक अत्यंत उपकारक, अमोघ व दिव्य अशी शक्ति आहे; पण आर्थिक नियतीच्या मूळ सिद्धान्ताशीं मार्क्स एकनिष्ठ राहिला असता तर ही शक्ति वांया गेली असती. महात्माजींच्याबद्दल असेंच