पान:भारतीय लोकसत्ता.pdf/१७४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१७३
गांधीवाद व लोकसत्ता

आध्यात्मिक होती. बरें, दोनतीन वर्षे ही जी आध्यात्मिक तयारी केली, तिचें फल काय ? तर चळवळीच्या दुसऱ्याच दिवशी तिच सूत्रे सोशॅलिस्टांनी हाती घेतली. दोन वर्षांच्या तयारीनंतर महात्माजींच्या तत्त्वान्वयें एकहि दिवस लढा चालला नाहीं. कसलीहि योजना न आखल्यामुळे विध्वंसक चळवळीला महात्माजींची संमति आहे, असें मश्रूवाला, काका कालेलकर यांना सुद्धां वाटले. म्हणजे अगदीं निकटवर्तीयांना सुद्धां गांधीजींची योजना माहीत नव्हती, त्यांचे मानस कळले नव्हते. पण योजना आंखणें व स्वतः विचार करणे हे ईश्वरी नियमनाच्या विरुद्ध आहे असेच तत्त्व जेथे अंगीकारलेले आहे तेथे दुसरे काय होणार? आणि अज्ञानामुळे हातून कितीहि चुका झाल्या तरी त्याचें शासन भोगावे लागत नाहीं, त्यामुळे कोणाचेच अहित होत नाहीं, ही त्याच्या भरीला श्रद्धा ! आपल्या देशांतील अनेक संस्थांचा कारभार सध्या या श्रद्धांच्या प्रेरणेनेच चालला आहे असे वाटते.
 भारतांत गेल्या तीस वर्षांत महात्माजींनी जे स्वातंत्र्य संग्राम केले, ते त्यांच्या मनांतून जरी सत्याग्रह-संग्राम करावयाचे होते, तरी ते निःशस्त्र प्रतिकार झाले हे मागे सांगितलेंच आहे. असे असले तरी काँग्रेसचे नेते सत्याग्रहाचेंच तत्त्व मनांत धरून बसल्यामुळे त्यांतील आत्मबलाच्या व आध्यात्मिकतेच्या मायामोहांतून ते सुटले नाहींत. आणि त्यामुळेच त्यांना योजनापूर्व तयारी, कार्यक्षमता, सावधता या गुणांची महती वाटली नाहीं. तशी वाटली असती तर १९३७ सालीं हाती सत्ता येतांच, ही सत्ता लवकरच केव्हांतरी सोडावी लागणार आहे, पुन्हां स्वातंत्र्याचा लढा लढावा लागणार आहे, हे जाणून त्या लढ्यासाठी दर खेड्यांतून संघटना उभारण्याची, त्यांनीं, दारूबंदीचे प्रयत्न करण्याच्या आधी, व्यवस्था केली असती. हा लढा शांततेनें, अहिंसेनें, अत्याचार न करतांच करावयाचा होता हें जरी खरें तरी, १९२६ सालीं वल्लभभाईनीं बार्डोलीस जशी तयारी केली होती तशी, या महासंग्रामाची योजना व तयारी करणे फार अवश्य होते. प्रत्येक खेड्यांतून सत्याग्रहींचे किंवा निःशस्त्र प्रतिकारकांचें दल उभारून त्यांची संघटना करून अखिल भारतीय सत्याग्रह दल तयार करणे यावर काँग्रेसनें सर्वस्व खर्च करणें अवश्य होते. त्यामुळे ४२ चा