पान:भारतीय लोकसत्ता.pdf/१७१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१७०
भारतीय लोकसत्ता

धर्म पूर्णपणे कळण्यापूर्वीच आपण त्यांना कायदेभंगाची प्रेरणा दिली हा हिमालयाएवढा प्रमाद झाला, असें १९१९ साली त्यांनींच म्हटलें. बार्डोलीचा संग्राम स्थगित करावा असे त्यांना अंतःसंवेदनेने सांगितले; पण हा इषारा या अद्भुत शक्तीनें दोन महिने आधीं दिला असता, तर राष्ट्राचा तेजोभंग टळला असता. १९४० सालानंतर गांधीजींनी जाहीर केले की, स्वातंत्र्य मिळाल्यावांचून हिंदुमुसलमानांचे ऐक्य होणे अशक्य आहे. त्यापूर्वी ४० वर्षे हिंदु-मुस्लीम ऐक्यावांचून स्वातंत्र्य नाहीं असें ते आग्रहाने सांगत. १९४० नंतरचे सत्यज्ञान त्यांना अंतःसंवेदनेने ४० वर्षे आधी दिले असतें तर केवढे अनर्थ टळले असते ! त्या दृष्टीने प्रारंभापासून सावधता ठेवली असती तर कदाचित् पाकिस्तानहि टळले असतें. पण अंत:संवेदनेने ते ज्ञान दिले नाहीं. १९४७ सालच्या अखेरीस साखरेवरचीं नियंत्रर्णे सरकारने उठविली. त्या वेळीं बुद्धि, विवेक, माहिती, अनुभव या साधनांनी विचार करणाऱ्या सर्व पंडितांनी उलट निर्णय दिला होता; पण गांधीजींच्या संवेदनेने निराळा कौल दिला आणि नियंत्रण उठवितांच अगदीं थोड्या अवधींत व्यापाऱ्यांनी जनतेच्या खिशांतले २४ कोटी रु. गिळंकृत केले. म्हणून महात्माजींना स्वतःला तसें वाटत असले तरी त्यांना बुद्धिपेक्षां जास्त प्रभावी अशी कसलीहि शक्ति वश नव्हती हें आपण ध्यानांत घेतले पाहिजे आणि या अंतःसंवेदनेपासून सावध राहिले पाहिजे. बुद्धि ही शक्ति सर्वंकष व सर्वज्ञ आहे असे मुळींच नाहीं; पण मानवाला वश अशी एवढीच शक्ति आहे. तेव्हां तिचीच जास्तीत जास्त जोपासना करणे अवश्य आहे; आणि म्हणूनच भौतिकवादाची व बुद्धिनिष्ठेची आपण केव्हांहि अवगणना करता कामा नये. गांधीवादांतील ही प्रवृत्ति आपण वाढू दिली तर आपली लोकशाही अल्पावधीतच कोसळून पडेल.

कार्यक्षमतेची उपेक्षा

 गूढ अतींद्रिय अशा अध्यात्माचें प्रभुत्व समाजावर बसूं लागले म्हणजे त्यांत विषमता निर्माण होते आणि भौतिक ज्ञानाची अवहेलना करण्याची प्रवृत्ति निर्माण होते हें येथवर सांगितले. अध्यात्मामुळे निर्माण होणाऱ्या आणखी एका घातकी प्रवृत्तीचा विचार करून हें विवेचन संपवूं. या