पान:भारतीय लोकसत्ता.pdf/१७२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१७१
गांधीवाद व लोकसत्ता

अध्यात्मामुळे बुद्धीची जशी अवहेलना होते त्याचप्रमाणे सुघटित, रेखीव, योजनाबद्ध, शास्त्रनिष्ठ जीवनाची व तज्जन्य कार्यक्षमतेचीहि उपेक्षा होऊं लागते. इंग्रजपूर्व काळांत हे पाप आपण केलेंच होतें. मध्यंतरी कार्यक्षमतेचें, शास्त्रनिष्ठेच महत्त्व आपण कांहीसे जाणूं लागलो होतों; पण गांधीवादाचें वर्चस्व झाल्यापासून पुन्हां या महनीय गुणांची अनास्था होऊं लागली आहे असे वाटतें. गांधीवादाचा सर्व भर मनाची शुद्धता, सद्भावना, हेतूंची पवित्रता, उच्च संकल्प यांवर असतो. योजना, कुशाग्रता, सावधता, चतुरस्रता या गुणांची तेथें महती नाहीं. शत्रूला जिंकावयाचें तें आत्मबलानें ! अर्थात् तेथें योजनेची व कुशाग्रतेची जरूरच काय ? वर सांगितलेल्या श्रद्धांच्या जोडीला गांधीजींची आणखी एक श्रद्धा होती. 'अत्यंत शुद्ध सद्हेतु असून जर एखाद्याच्या हातून चुका घडल्या तर त्यामुळे वस्तुतः जगाला, इतकेंच नव्हे तर कोणत्याहि व्यक्तीला इजा पोचत नाहीं, अशी माझी श्रद्धा आहे. ईश्वराला भिऊन वागणाऱ्या माणसाकडून अहेतुकपणें झालेल्या चुकांच्या परिणामापासून ईश्वर जगाचें नेहमीं रक्षण करतो. माझ्या चुकांमुळे जगाला कधींहि पीडा सहन करावी लागलेली नाही. कारण त्या चुका माझ्या हातून अज्ञाज्ञानें घडल्या होत्या' असे प्रतिपादन गांधीजींनीं 'सत्याचा सिद्धांत' या लेखांत केलेले आहे. (गांधीजींच मानस पृ. २६) गांधीजींची ही श्रद्धा अनुभव, इतिहास यांशी अगदी विसंगत आणि म्हणूनच अगदी भोळी आहे. पूर्ण अध्यात्मवादी अशा एका तत्त्ववेत्याने सुद्धां 'अग्नि थंड आहे अशा अर्थाची शंभर श्रुतिवचनें सांपडलीं तरी तें सत्य मानतां येणार नाहीं.' असे स्वच्छ बजाविले आहे. ती श्रद्धा बाळगण्याचे धाडस त्यालाहि झाले नाहीं. पण गांधीजींनी ते केले आहे. मानवाच्या हातून प्रमाद घडला कीं, परिस्थिति किंवा निसर्ग कसलीहि क्षमा करीत नाहींत असा नित्याचा अनुभव आहे. अत्यंत कठोर व क्रूर अशी शिक्षा ते करतात. यातना भोगायला लावतात. पण यातनांचा अग्नि परमेश्वर कृपेनें थंड होतो अशी गांधीजींची श्रद्धा आहे. या अध्यात्मवृत्तीमुळेच योजना, आंखणी यांचा पूर्ण अभाव हें गांधीजींच्या सर्व संग्रामांचे मुख्य लक्षण होऊन बसलें होतें आणि त्यांचे पट्टाभीसारखे अनुयायी त्यांतच भूषण मानीत असत. तीस सालचा लढा, राजकोट प्रकरण यांचा उल्लेख मागें केलाच आहे.