पान:भारतीय लोकसत्ता.pdf/१७०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१६९
गांधीवाद व लोकसत्ता

सत्य व नीति यांनाहि भौतिक ज्ञानाचा आधार अवश्य आहे. खोटें बोलू नये, चोरी करूं नये, मातापित्यांचें ऐकावें ही वैयक्तिक व कौटुंबिक नीति फारतर भौतिक ज्ञानाच्या अभावीं टिकूं शकेल; पण सामाजिक व राष्ट्रीय नीतिमत्ता जिला म्हणतात ती शास्त्रीय भौतिक ज्ञानाच्या अभावीं क्षणभरहि टिकणार नाहीं. अशिक्षित, अडाणी मनाला राष्ट्राच्या विशाल स्वरूपाचें आकलनच होत नाहीं. त्याला आई दिसूं शकते म्हणून तिच्याविषयींचें कर्तव्य त्याला आकळतां येते; पण अखिल भरतखंड त्याला दिसतच नाहीं. त्याला इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, रसायन, पदार्थविज्ञान यांचा नेत्रच प्राप्त व्हावा लागतो. विद्येच्या पुनरुज्जीवनानंतर पश्चिमेच्या युरोपीय राष्ट्रांना तो प्राप्त झाला. म्हणूनच हळूहळू त्यांच्यांत राष्ट्रनिष्ठा व लोकशाही यांचा उदय झाला. हिंदुस्थानांत अखिल समाजाला एकत्र बांधून कार्यप्रवण करणारी अशी एकहि निष्ठा उदय पावली नाहीं. इंग्रज व मराठे यांच्या लढाईत इंग्रज हा इंग्रजाविरुद्ध लढणार नाहीं हें ठरलेले होते. पण हिंदुस्थानांत तसें कांहींच ठरलेले नव्हते. हिंदु-हिंदु एक नव्हता, मुसलमान-मुसलमान नव्हता, मराठा-मराठा नव्हता. स्वामिनिष्ठाहि या समाजाला, किंवा येथल्या कोणच्याहि अल्पसमूहाला दीर्घकाल बांधूं शकली नाही. याचें कारण हेंच कीं, यांची मानसिक शृंखला तुटलेली नव्हती व यांना विशाल प्रपंच पाहण्याची दृष्टि आलेली नव्हती. तेव्हां सत्य व नीति यांनाहि ज्ञानाचा आधार अवश्य आहे. पण गांधीवादाला ज्ञानाचें हे सामर्थ्य मान्य नाहीं. उत्तर आयुष्यांतल्या कांहीं लेखनांत गांधींजींनी शिक्षणाचा प्रसार होणे अवश्य आहे, मी उच्च ज्ञानाच्या विरुद्ध नाहीं असे प्रतिपादन केले आहे. पण ज्या ज्ञानाच्या उपासनेसाठी माणसाने शक्तिसर्वस्व वेचणे अवश्य आहे त्याविषयीं बोलतांना 'मी त्याच्याविरुद्ध नाहीं.' एवढाच पुरस्कार कोणी करूं लागला तर त्याचा अर्थ सहज कळण्याजोगा आहे.
 इतकेंहि करून अंतःसंवेदना ही शक्ति तशीच प्रभावी असती तर तिला मान्यता देऊन बुद्धिवादाला गप्प बसावे लागले असते; पण तसे काहींच नाहीं. ही अंतःसंवेदना महात्माजींना पुष्कळ वेळां असत्य ज्ञानच देत असे व म्हणून त्यांना पश्चाताप करण्याची पाळी येत असे. लोकांना अहिंसा-