पान:भारतीय लोकसत्ता.pdf/१६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१५
प्राचीन भारतांतील लोकसत्ता

जात असे. डॉ. आळतेकर म्हणतात कीं, चातुर्वर्ण्यपद्धतीवर त्या वेळीं हिंदु समाजाचा विश्वास होता. त्या वेळीं कर्मफल- विपाकाच्या सिद्धान्तावर लोकांची श्रद्धा होती. पूर्वजन्मांतील पातकांमुळेंच मनुष्यास शूद्र चांडाळादि जातीत जन्म येतो व त्या पातकांचे क्षालन करण्यासाठीं त्या जन्मांत प्राप्त होणारीं दुःखे त्याने सोसलीच पाहिजेत, असे लोकांना वाटत असे; शूद्र चांडालादिकांचीहि या तत्त्वावर श्रद्धा होती. तेव्हां शूद्रचांडालांवरचे अन्याय्य निर्बंध काढून टाकण्याचें एखाद्या राजाने ठरविले असते तर लोकक्षोभाच्या वणव्यांत त्याची सत्ता भस्मसात् झाली असती. हे सर्व खरें असले तरी तें फार तर वस्तुस्थितीचे वर्णन आहे किंवा विषमता कां होती याचें स्पष्टीकरण आहे, असे म्हणतां येईल. पण अशा समाजांत लोकशाही अवतरली होती असे म्हणणें कठिण आहे. कोणचीहि जुनी समाजव्यवस्था बदलतांना लोकक्षोभ हा होणारच. त्यांतूनच नवीं तत्त्वें उदयास येतात व ती लोकांना पटलीं म्हणजे नवी समाजव्यवस्था दृढमूल होते. तेव्हां लोकक्षोभ झाला असता, असे म्हणून आपणांस त्या प्राचीन व्यवस्थेचे समर्थन करतां येणार नाहीं. प्राचीन व मध्ययुगीन युरोपांतहि अशीच विषमता होती असे डॉ. आळतेकरांनी म्हटलें आहे. पण अशा त्या विषम व्यवस्थेवर तेथील तत्त्ववेत्त्यांनी प्रखर हल्ले केले आणि ती नाहींशी करून समता निर्माण केली तेव्हांच तेथे लोकशाही प्रस्थापित झाली. भारतांत असे प्रयत्न झाल्याचे, अशा तऱ्हेचे विचार सांगितले गेल्याचेहि कोठें आढळत नाहीं. मुख्य वैगुण्य आहे तें हें आहे.

अथेन्सशी तुलना

 ग्रीक लोकसत्तेचे सोलन, पोरिस्ट्राटस्, क्लेइस्थेनिस हे जे नेते त्यांनीं पहिली जी गोष्ट केली ती ही की, अथेन्समधील जन्मनिष्ठ उच्चनीचता त्यांनी नष्ट केली व जन्माने श्रेष्ठ ठरलेल्या खानदानी वर्गाच्या हातची सत्ता काढून घेऊन ती इतरांना वाटून दिली. खानदानी वर्गाच्या हातून प्रथम ही सत्ता धनिक व्यापारी वर्गाच्या हातीं गेली. तरीसुद्धां लोकशाहीच्या दृष्टीनें ही मोठीच प्रगति आहे. कारण धन मिळविणे हे माणसाच्या हातचे आहे, स्वाधीनचे आहे. वरिष्ठ जातींत जन्म मिळविणे हे नाहीं. 'जन्मसिद्ध