पान:भारतीय लोकसत्ता.pdf/१६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१६७
गांधीवाद व लोकसत्ता

म्हणूनच खरी भारतीय संस्कृति तेथें दृष्टीस पडते. जे पाश्चात्य सुधारणांच्या आहारी गेले, तेच फक्त गुलाम झाले असून त्यापासून मुक्त असलेला शेतकरी हा अजिंक्य आहे. त्याला कोणी जिंकलेले नाहीं व जिंकणे शक्य नाहीं. (म्हणजे काय ते कळणे शक्य नाहीं !) अर्वाचीन शिक्षणानें हितापेक्षां अहितच जास्त होतं.' हे व अशा तऱ्हेचे विचार प्रगट करून ते म्हणतात की, 'मी जे प्राथमिक व उच्च शिक्षण घेतलें ते मुळींच घेतले नसतें तरी माझे जिणें व्यर्थ झाले असते असे मला वाटत नाहीं. या शिक्षणाच्या घातक वर्चस्वांतून मी सध्यां मुक्त झालो आहे. सत्याग्रही वीराला फक्त मनोजय लागतो. त्याला शिक्षण लागत नाहीं. मनोजय साधला, की त्या एकट्या सत्याग्रहीच्या नुसत्या दृष्टिपातानें शत्रु नष्ट होतो.' सामान्यतः विद्यासंपन्न सुशिक्षितांनीं नागर संस्कृति निर्माण केली असे आपण समजतो. पण महात्माजींच्या मते मोठीं नगरें, शहरें ही सर्वथा त्याज्य होत. चोर, डाकू, बदमाष, वेश्या हे वर्ग शहरांमुळे निर्माण होतात आणि म्हणूनच ते म्हणतात की, 'तुम्ही एक सहा महिने खेड्यांत जाऊन रहा की तुम्ही खरे देशभक्त व्हाल.' महात्माजींच्या मतें रेल्वे येण्यापूर्वी भरतखंड हें एक राष्ट्र होतें. रेल्वे आल्यामुळे सर्व नाश झालेला आहे. रेल्वेमुळे दळणवळण वाढले व त्यामुळेच प्लेगासारखे रोग पसरले; दुष्काळ वाढले व तीर्थक्षेत्रे बिघडून गेलीं. परमेश्वरानें मनुष्याच्या हातापायांत बेताची शक्ति ठेवली होती. त्याचा हेतु असा की, माणसाने फार प्रवास करूं नये. आसपासच्या टापूंत फार तर जावे; पण माणसानें आपल्या दुष्ट बुद्धीने या दैवी मर्यादांचें उल्लंघन करण्याच्या युक्त्या शोधून काढल्या (म्हणजे शास्त्रीय शोध लावले) आणि आपल्या बुद्धीचा दुरुपयोग केला.' हे सर्व विचार गांधीजींनी १९०८ साली लिहिलेल्या 'हिंदस्वराज्य' या पुस्तकांत सांगितले आहेत. पुढील काळी त्यांनी मत बदलले असे नाहीं. १९३८ सालीं वरील पुस्तकांविषयी लिहितांना, यांतील एक अक्षरहि फिरविण्यास मी तयार नाहीं, असे त्यांनी जाहीर केले आहे.
 बुद्धि व भौतिकज्ञान यांची ही अवगणना अगदीं अक्षम्य असून परिणामी घातक ठरल्यावांचून रहाणार नाहीं. निसर्गघटनांचा कार्यकारणभाव