पान:भारतीय लोकसत्ता.pdf/१६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१६६
भारतीय लोकसत्ता

कुठे जात आहे, कां जात आहे; याचा कांहींहि विचार केलेला नाहीं. ईश्वर मला नेत आहे. तेव्हां मी विचार करणे हे ईश्वरी योजनेंत कदाचित् विघ्नहि ठरेल.' वर्णाश्रम धर्मावर महात्माजींची श्रद्धा होती; पण ते म्हणत कीं, 'शूद्रानें ब्राह्मणाचें कर्म करण्यास हरकत नाहीं, तरी त्याने ब्राह्मण म्हणवून घेण्याचा आग्रह मात्र धरूं नये. या जन्मी त्याने पुण्य संपादन केले की, त्याला पुढोल जन्मीं ब्राह्मण जातीतच जन्म मिळेल.' (यंग इंडिया. २३-४-२५) समाजरचनेंतल्या मूल समस्यांनाहि महात्माजी असे अतींद्रिय निष्ठेनें उत्तर देत. एखाद्या व्यक्तीला- मग ती कितीहि लहान किंवा मोठी असो- विशिष्ट हेतूने राजकोटला घेऊन जाण्याइतका परमेश्वर जेव्हां सामाजिक प्रपंचात हस्तक्षेप करतो आणि तुम्हीं बौद्धिक चिकित्सा केलीत तर माझ्या योजनेंत विघ्न येईल असे बजावतो, तेव्हां हा परमेश्वर लोकशाहीला ठार केल्यावांचून रहाणार नाहीं असें निश्चित समजावें.

बुद्धिवादाची अवहेलना

  गांधीवादांतील जगत्कल्याणकारी परमेश्वर, त्यांतील आत्मबल व अंतःसंवेदना यांच्या वर्चस्वामुळे म्हणजेच एकंदर अध्यात्मनिष्ठेमुळे समाजाची दोन प्रकारानें कशी हानि होते ते सांगितले. एक म्हणजे समाजांत पराकाष्ठेची विषमता निर्माण होते व दुसरे म्हणजे त्यामुळे बुद्धिवाद, भौतिकज्ञान, तर्कनिष्ठा यांची अवहेलना होते. त्यांतील दुसऱ्या प्रकारच्या नुकसानीचें थोडें जास्त विवेचन करणे अवश्य आहे. महात्माजींचें एकंदर लेखन वाचतां असें स्पष्ट दिसून येते की, त्यांना भौतिक विद्या, इतिहास, अर्थशास्त्र, नानाप्रकारची विज्ञानें, यांतील पांडित्याची, यांच्या खोल अभ्यासाची विशेष महती वाटत नाहीं. इतकेच नव्हे तर त्यांच्या अंतरांत खोल कोठेंतरी या भौतिक पांडित्याविषयीं तिटकारा आहे. 'हिंदस्वराज्य' या आपल्या पुस्तकांत या ज्ञानाचा जेवढा अधिक्षेप करणे मनुष्याला शक्य आहे, तेवढा त्यांनी केलेला आहे. ज्या इंग्रजी शिक्षणामुळे आपल्या देशांत वरील ज्ञानाचा प्रसार झाला, त्याच्याविषयों त्यांनी काय म्हटले आहे पहा. 'इंग्रजी शिक्षणाच्या प्रसारामुळे आपला देश गुलाम झाला आहे. इंग्रजी शिकलेल्या लोकांनींच जनतेला फसविले आहे. खेडी अजून पाश्चात्य ज्ञानापासून मुक्त आहेत,