पान:भारतीय लोकसत्ता.pdf/१६६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१६५
गांधीवाद व लोकसत्ता

राष्ट्र त्याला सिद्ध आहे असे कित्येकांचे मत होते. गांधीजींना या मतानें धक्काच बसला. त्यांच्या मते राष्ट्र मुळींच सिद्ध नव्हते. लढ्याची पूर्वतयारी झाली नव्हती. तेव्हां सत्याग्रह संग्राम सुरू करण्यांत अर्थ नव्हता. आतां लढ्याची पूर्वतयारी म्हणजे काय, असा प्रश्न येणारच. चरखा व खादी हें त्याला गांधीजींचे उत्तर होते. ते उत्तर देऊन त्यांनी असे स्पष्ट बजावलें कीं, 'तुमच्यापैकी बहुतेकांचा चरख्यावर विश्वास नाही. तुम्हांला हा कार्यकारणसंबंध मान्य नाहीं; पण मी तुमचा सेनापति आहे आणि काँग्रेस ही लढाऊ संघटना आहे. तिच्यांत शिस्त अवश्य आहे; आणि खरी शिस्त कोणची? आपल्या बुद्धीला पटत नसलेल्या आज्ञासुद्धां उत्साहाने पार पाडणे ही खरी शिस्त होय. सेनापति निवडतांना तुम्ही बुद्धि वापरा; पण नंतर प्रत्येक आज्ञेची चिकित्सा करण्याचा अधिकार तुम्हांला नाहीं. तेवढ्यापुरती लोकशाही संपली असें समजा' (पट्टाभि, काँग्रेस-इतिहास, खंड २ रा पृ. १७७). सेनापति, लढाई हें उदाहरण घेतलें तर वरील आदेश सयुक्तिक दिसतो. कारण लोकशाहीतहि प्रत्येक सैनिकाला चिकित्सा करण्याचा अधिकार देतां येणार नाहीं; पण हे उदाहरण घेण्यांत मोठा हेत्वाभास आहे. सेनापतीनें प्रत्येक सैनिकाला कारणमीमांसा सांगत बसूं नये हें युक्त आहे; पण सेनापतीजवळ कारणमीमांसा तयार असलीच पाहिजे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना तरी त्याने ती पटवून दिली पाहिजे. महात्माजींच्या जवळ तर्कगम्य अशी मीमांसाच नव्हती आणि म्हणूनच जवाहिरलाल, राजाजी, वल्लभभाई यांनाहि तिचे आकलन होत नव्हते. तरीसुद्धा आपल्याला सेनापति नेमावयाचे असेल तर लोकांनी चिकित्सा न करता आपल्या आज्ञा मानल्या पाहिजेत, असा त्यांचा आग्रह होता. याचा अर्थ असा कीं, गांधीजींची मीमांसा आध्यात्मिक होती, गूढ होती, अतीन्द्रिय होती. महात्माजींच्या सर्व कृतींवर, विचारांवर, मतांवर अध्यात्माचे असें गूढ व अगोचर वातावरण पसरलेले असे. त्यांचा मुख्य आलंब म्हणजे आंतला आवाज. बार्डोलीचा लढा त्यांनी स्थगित केला तो त्याच्याच आदेशानें खादी व अहिंसा यांचा स्वातंत्र्याशी संबंध ते प्रस्थापित करतात तो त्याच्याच आधाराने. अस्पृश्यतेमुळे भूकंप होतात यालाहि प्रमाण तोच. १९३९ सालीं ते राजकोटला गेले. त्या वेळी महादेवभाईना लिहिलेल्या पत्रांत ते म्हणतात, 'मी