पान:भारतीय लोकसत्ता.pdf/१६५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१६४
भारतीय लोकसत्ता

होत आली होती. महात्माजींनी या अंतःसंवेदनेवरील श्रद्धेला पुन्हां दृढता आणली. स्वतःला अंतर्ज्ञान होते असे त्यांना वाटत असे आणि भारतीय राजकारणांत अनेक महत्त्वाचे निर्णय त्यांनी या अंतःसंवेदनेवर विसंबून कायम केले आहेत. अंतःसंवेदनेवरील ही श्रद्धा लोकसत्तेला पराकाष्ठेची घातक ठरते. कारण या श्रद्धेमुळे बुद्धिगम्य ज्ञान, तार्किक विचारसरणी, बुद्धिवाद यांना गौण स्थान प्राप्त होते, त्यांची अवगणना होते आणि ही अवगणना झाली कीं समाजांत पराकाष्ठेची विषमता निर्माण होते. भांडवलशाहीत अपार धन जसे कांहीं थोड्या व्यक्तींनाच लाभते, त्याचप्रमाणे परमार्थशाहीत अंतःसंवेदनेचें धनहि फार थोड्यांनाच लाभते; आणि मग ती भाग्यवान् माणसे इतरांना आपले दास करून ठेवतात. भांडवली धनाचा भांडवलशहा जसा आज दुष्ट उपयोग करतात, तसाच याहि बलाचा पोपसारखे लोक दुष्ट उपयोग करतात, हे इतिहासाने दाखविले आहे. युरोपांत भौतिक विद्येच्या पुनरुज्जीवनाची जी चळवळ झाली तिनें लोकांना या पारमार्थिक शहांच्या गुलामगिरीतून सोडविलें. प्रत्येकाला स्वतःच्या बुद्धीनें निर्णय करण्याचा अधिकार आहे, हे महातत्त्व या चळवळींतून निर्माण झाले आणि लोकशाहीचा पाया तेथेच घातला गेला. बुद्धीचा अधिकार मान्य झाल्यामुळे माणसांचे व्यक्तित्व सिद्ध झाले. स्वतःची बुद्धि वापरण्याचा हा अधिकार, आपल्या विवेकानें निर्णय करण्याचा हा हक्क, प्रत्येक घटनेची स्वतः चिकित्सा करण्याची मानवाची ही योग्यता अमान्य झाली, तर लोकशाहीला शून्य अर्थ आहे. गांधीवादाने कळून वा नकळून हा हक्क अमान्य केला आहे. महात्माजी दांडीला निघाले तेव्हा आपल्या अनुयायांनी नंतर काय करावयाचे हे त्यांनी कोणालाच सांगितले नव्हतें. त्याविषयीं पट्टाभि म्हणतात, 'कदाचित् गांधींनाहि ते माहीत नसेल. एखाद्या स्फूर्तिस्फुलिंगाच्या प्रकाशांत त्यांना ज्ञान होई व अंतःसंवेदनांनीं ते आपला व्यवहार करीत. धर्मप्रवण व्यक्तीला विवेक आणि बुद्धि हीं मार्गदर्शक नसतात आणि म्हणूनच आपल्या प्रतिकार-पद्धतीची बौद्धिक चिकित्सा न करण्याची धोक्याची सूचना गांधीजींनी दिली होती.' (काँग्रेसइतिहास, खंड १ ला, उत्तरार्ध पृ. ६१) १९४० सालीं पुढील लढा कसा द्यावयाचा याची चर्चा काँग्रेसच्या बैठकींत चालू होती. लढा तत्काळ सुरू करावा,