पान:भारतीय लोकसत्ता.pdf/१६४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१६३
गांधीवाद व लोकसत्ता

तसें नाहीं. अध्यात्मक्षेत्रांतील प्रत्येक श्रद्धा सामाजिक प्रपंचाच्या ऐहिक व्यवहारांत प्रभावी ठरते, असे मानून ते त्या धोरणानें कार्याला वळण देतात. एकटा एक सत्याग्रही आत्मबलाने शत्रूला जिंकील, ही त्यांना अत्युक्ति वाटत नाही. त्या श्रद्धेमुळे ते वैयक्तिक सत्याग्रहाचा आदेश देतात आणि सत्याग्रहींच्या पापपुण्याची चवकशी करूनच त्यांना चळवळींत भाग घेण्यास अनुज्ञा देतात. याच्या जोडीला त्यांच्या प्रार्थना, त्यांचे रामनामाचे जप, त्यांची उपोषणे यांचा विचार केला तर त्यांचे आत्मबल हें एक गूढ व अतींद्रिय बल असले पाहिजे, याविषयी शंका रहात नाहीं. समाजाच्या ऐहिक व्यवहारावर बुद्धीला अनाकलनीय अशा अतींद्रिय बलाचें म्हणजेच आत्मबलाचे प्रभुत्व जो जो जास्त होते, तो तो तो समाज लोकशाहीपासून दूर जाऊं लागतो. कारण हें आत्मबल (अशी कांहीं शक्ति आहे असे क्षणभर गृहीत धरले तरी) लाखांतून एखाद्याला वश असणार. इतरांना स्वप्नांतहि त्याची प्राप्ति होणें शक्य नाहीं. अर्थात् ही पराकाष्ठेची विषमता होय. भांडवलामुळे निर्माण झालेली विषमता या अध्यात्मामुळे निर्माण झालेल्या विषमतेपुढे कांहींच नव्हे. प्रार्थना, रामनामजप, उपोषणे यांचा जोर वाढला म्हणजे भांडवलशाहीत झाली नसतील इतकी जनतेचीं मनें पंगु होतात, दुबळीं होतात. असल्या जनतेला लोकशाही पेलणे कधींच शक्य नाहीं.

अंतःसंवेदना

 गांधीजींची अंतःसंवेदनेवरील श्रद्धा व भारतीय राजकारणाचें त्यांनी त्या अंतःसंवेदनेने॑- म्हणजेच प्राकृत भाषेत आंतल्या आवाजानें- केलेले सूत्रचालन ही गांधीवादांतील अध्यात्मनिष्ठेची पराकोटी होय. आपली ज्ञानेंद्रियें व बुद्धि यांच्याहून निराळें असें एक ज्ञानसाधन थोर पुरुषांना उपलब्ध असतें, अशी कल्पना प्राचीन काळी सर्व जगांत रूढ होती. सर्व धर्मसंस्थापक, धर्मप्रवक्ते, साधुसंत, पोपसारखे धर्मपीठांचे अधिकारी यांना ही परमेश्वरी वाणी प्रसन्न असते, अशी लोकांची समजूत होती. पंधराव्यासोळाव्या शतकांत विज्ञानाचा उदय झाल्यावर या श्रद्धेचा जोर कमी झाला आणि अलीकडे ऐहिक व्यवहारापुरती तरी बहुतेक सर्व जगांत ही श्रद्धा नाहींशीं