पान:भारतीय लोकसत्ता.pdf/१६३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१६२
भारतीय लोकसत्ता

सांगण्याचा आचार्य जावडेकरांनी प्रयत्न केला आहे. 'निष्कामसेवा, निःपक्षपाती प्रेम आणि अहिंसक शौर्य या गुणांना आत्मबल ही संज्ञा देतां येईल. सेवा, जनताप्रेम, शौर्यशाली सत्यनिष्ठा, त्याग, शौर्य, चिकाटी हे सर्व आत्मगुण होत असा अर्थ सांगून, जुन्या निष्ठा नष्ट करून नव्या निर्माण करणें हें आत्मबलाशिवाय शक्य होत नाहीं. केवळ बुद्धिबलाचा सामाजिक क्रान्तिकार्यास फारसा उपयोग होत नाहीं,' असा सिद्धान्त आचार्य सांगतात. (गांधी- जीवन रहस्य पृ. ४२८-२९). पण आत्मबलाचा एवढाच अर्थ असेल, तर त्यांत नवीन असें कांहींच नाहीं. वरील आत्मगुणांची महती सर्वांनाच मान्य होती व आहे. भौतिकनिष्ठ व भोगवादी युरोपांतहि मॅझिनी, लिंकन, लेनिन यांसारखे क्रान्तिधुरीण व सामाजिक क्रान्तीच्या लहानलहान क्षेत्रांतले शेकडों कार्यकर्ते आत्मबलानें संपन्न होते, हे कोणालाहि मान्य करावें लागेल; पण महात्माजींचे आत्मबल ते हें नव्हे. ते कांही तरी गूढ व अतींद्रिय असेंच बल असले पाहिजे. १९३४ साली काँग्रेसमधून गांधीजी बाहेर पडले, त्यावेळी त्यांनी बाहेर पडण्याचीं जीं कारण सांगितलीं, त्यांतलें एक प्रमुख कारण त्यांनी असे सांगितले की, 'सत्याग्रहास अवश्य असणारी शुद्ध आत्मिक शक्ति वाढविण्यासाठी मीं राष्ट्रसभेच्या कार्यातून निवृत्त होत आहे.' आतां गांधीजींनीं आत्मशक्ति वाढवावयाची म्हणजे काय करावयाचे ते कळत नाहीं. काँग्रेसमध्ये ते राहिले तर ती वाढणार नाहीं व बाहेर पडले तरच वाढणार, म्हणजे काय ते कळणें त्याहून कठीण आहे. प्राचीन काळच्या ऋषिमुनींसारखेच हेंहि बल गूढ, अतर्क्य व अनाकलनीय आहे असे मानले तरच याचा कांहीं अर्थ लागतो. 'खरा प्रामाणिक व निष्ठावंत असा एक जरी सत्याग्रही मिळाला तरी तो इंग्रजांना नमवूं शकेल' असे जेव्हां ते म्हणतात, तेव्हां त्या आत्मबलाचा असाच अर्थ त्यांच्या मनांत असला पाहिजे. ही उक्ति केवळ अतिशयोक्ति असती तर तिचा अर्थ समजला असता; पण महात्माजींच्या बाबतींत तसें म्हणतां येत नाहीं. त्यांच्या अध्यात्मनिष्ठेच्या कोणच्याच बाबतींत हें म्हणणे सयुक्तिक ठरणार नाहीं. वर सांगितलेली भोळी, श्रद्धाळू ईश्वरनिष्ठा ही लोकशाहीच्या अनेक पुरस्कर्त्यांच्या चित्तांत पूर्वी असे व अजूनहि असणे शक्य आहे; पण स्वतःची मनःशांति व मानसिक उन्नति यापलीकडे ते तिची मर्यादा जाऊं देत नाहींत. महात्माजींचे