पान:भारतीय लोकसत्ता.pdf/१६२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१६१
गांधीवाद व लोकसत्ता

उन्नतीची काळजी वहाते, विश्वांत न्यायाची प्रस्थापना करते, सत्याचा सर्वत्र जय होईल अशी व्यवस्था करते आणि मानवानें मनापासून तिची प्रार्थना केल्यास ती त्याला अनुकूल होते अशी अध्यात्मवादाची श्रद्धा आहे. गांधीजींची अशीच श्रद्धा होती. आगरकरांच्या कार्याचे विवेचन करतांना भौतिक अधिष्ठान या लेखांत आपण असें पाहिले आहे कीं, ही श्रद्धा मानवाच्या सर्व जीवितावर प्रभुत्व गाजवीत असेल, तिचे वर्चस्व सर्वत्र अबाधितपणे चालत असेल, तर ती श्रद्धा लोकशाहीला मारक झाल्यावांचून रहाणार नाहीं. मानवाची जी अल्पस्वल्प बुद्धिवशता आहे, तर्कनिष्ठा आहे तिच्यावरच लोकशाहीची सर्व इमारत उभी रहात असते आणि अध्यात्मवादांत बुद्धि, तर्क, बौद्धिक चिकित्सा, भौतिक ज्ञान यांची अवगणना होते. गांधीवादानें कळून वा न कळून अशी अवगणना निश्चित केली आहे. महात्माजी परमेश्वराचे स्वरूप वर्णून सांगतांना, सत्य म्हणजेच परमेश्वर, असें कांहीं वेळां सांगतात. ही निष्ठा बुद्धिवादाला मारक होत नाहीं; पण त्यांची खरी निष्ठा तुकाराम- नामदेवांसारखी आहे. त्यांचा परमेश्वर प्रार्थनेला वश आहे. तो अभक्तांना शासन करतो. भक्तांचा योगक्षेम चालवितो. म्हणून त्यांनी कसलाहि सांठा करण्याची गरज नाहीं. हा परमेश्वर जगाच्या व्यवहारांत नित्य हस्तक्षेप करतो आणि आपण अस्पृश्यतेसारखी पापें केली तर भूकंपासारखे उत्पात घडवून आपणांस शासन करतो. अशा या परमेश्वराचे आकलन होण्यास गुरुकृपेची आवश्यकता आहे, त्यावांचून सत्यज्ञान होणे अशक्य आहे, अशीहि महात्माजींची श्रद्धा आहे. (आत्मचरित्र पृ. ११३). जगाच्या व्यवहारांत नित्य हस्तक्षेप करणारा, सत्याचा विजय घडवून आणण्यांत तत्पर असलेला, पापपुण्याची यथायोग्य दखल घेणारा व गुरूच्या मध्यस्थीनेंच वश होणारा परमेश्वर हा बुद्धिवादाला व म्हणूनच लोकसत्तेला अत्यंत घातक आहे.

आत्मबल

 या अध्यात्मनिष्ठेतून निर्माण होणारी आत्मबलाची कल्पना अशीच लोकशाहीशीं विसंगत आहे. या आत्मबलाचा कांहींसा बुद्धिगम्य अर्थ
 भा. लो. ११