पान:भारतीय लोकसत्ता.pdf/१६१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१६०
भारतीय लोकसत्ता

 पण यापेक्षांहि जास्त चमत्कारिक कारण आहे. गांधीवादी पंडित असे सांगतात की, गांधीजींचे विचार व मतें आणि त्यांनी घेतलेले निर्णय बहुधा योग्य व अचूक असतात. पण त्यांचे समर्थन पुष्कळ वेळां ते इतक्या विचित्र पद्धतीने करतात कीं, त्या विचारांची हानीच व्हावी. तर्कशुद्ध रचना करून आपला मुद्दा सिद्ध करण्याची कला महात्माजींना तितकीशी वश नव्हती व त्यामुळे त्यांचे सिद्धांत समर्थनीय व शास्त्रशुद्ध असूनहि त्यांच्याविषयीं घोटाळा होतो, असें यांपैकीं कांहीं पंडितांचे मत आहे. 'पॉवर ऑफ नॉनव्हायोलन्स' या आपल्या पुस्तकांत रिचर्ड ग्रेग यांनी अशासारखाच विचार मांडला आहे. 'अनत्याचारी, अहिंसात्मक, प्रतिकाराच्या सिद्धांताविषयीं गांधीजी जें स्पष्टीकरण देतात, समर्थन करतात तें आपणां पाश्चात्यांना पटण्याजोगें नाहीं. आपणांहून त्यांची जीवनविषयक वृत्ति व वैचारिक पार्श्वभूमि फार निराळी आहे, म्हणून त्यांच्या सत्याग्रहाचे स्वतंत्र विवेचन करण्याची आवश्यकता आहे' असें प्रारंभींच ग्रेग यांनी सांगून ठेवले आहे. आचार्य कृपलानी यांचेंहि मत असेंच आहे.
 या कारणामुळे महात्माजींचे कार्य व गांधीवाद म्हणून प्रचलित असलेले तत्त्वज्ञान यांचा आपण अत्यंत सावधगिरीने अभ्यास केला पाहिजे. गेल्या प्रकरणांत वर्णिलेले त्यांचे सत्याग्रह- संग्राम व त्यामुळे त्यांनी घडवून आणलेली लोकजागृति ही क्षणभरहि दृष्टिआड न करता त्यांच्या प्रकाशांतच महात्माजींच्या कृति व उक्ति आपण जोखून पाहिल्या पाहिजेत. त्यांची अनेक तत्त्वे व कृति, सकृतदर्शनीं पहातां, लोकशाहीला व एकंदर समाजाच्या प्रगतीला निश्चित घातक अशीं दिसतात; पण तेवढ्यामुळे आपण त्यांच्या महाकार्याचा विपरीत अर्थ केला, त्यांच्या थोर चारित्र्यावर पामीदत्ताप्रमाणे कलंक फासला तर त्यांत आपलाच घात आहे. उलट पट्टाभीप्रमाणे भोळ्याभाबड्या अंधभक्तीने सर्वच्या सर्व गांधीवाद आपण उपकारक म्हणून स्वीकारला तर तेहि हानिकारक आहे. तेव्हां आपला विवेक सर्वतोपरी जागृत ठेवून मोठ्या दक्षतेने आपण या जगद्वंद्य महाविभूतीच्या कार्याचे परीक्षण केले पाहिजे.
 गांधी-जीवनाचें व म्हणूनच गांधीवादाचें मूल महातत्त्व म्हणजे अध्यात्मनिष्ठा हे होय. पंचज्ञानेंद्रियें व बुद्धि यांना अनाकलनीय अशी एक शक्ति या विश्वाचे नियंत्रण करीत असते, ती विश्वाचें भरणपोषण करते, मानवाच्या