पान:भारतीय लोकसत्ता.pdf/१६०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१५९
गांधीवाद व लोकसत्ता

मी लिहूं लागलों की पूर्वी आपण काय म्हणालो होतो याचा कधींहि विचार करीत नाहीं. त्या त्या क्षणीं ने सत्य मला प्रतीत होतें त्याशीं सुसंगति ठेवर्णे येवढेच माझें धोरण असते.' असे त्यांनीं स्वतःच सांगून ठेवले आहे. (हरिजन ३०- ९- ३९) जन्मनिष्ठ वर्णव्यवस्था त्यांना मान्य आहे. इतकेंच नव्हे तर, आत्म्याच्या विकासासाठीं बेटिबंद जातिव्यवस्था अवश्य आहे, असेंहि ते म्हणतात. पण जातिव्यवस्थेमुळे हिंदुसमाजाचा अधःपात झाला असे सांगून मिश्रविवाह व सहभोजन यांचा पुरस्कारहि ते करतात. वर्धाश्रमांत विवाह व्हावयाचा तर वधूवरांपैकी एकजण हरिजन असलाच पाहिजे अशी त्यांची शेवटी अट असे आणि पहिल्या व दुसऱ्या मतांत विसंगति आहे असें कोणी दाखवून दिल्यास 'मला तसे मुळींच वाटत नाहीं' असे ते सांगत. असे प्रकार एकदोनदांच घडले असे नाहीं. गांधी तत्त्वज्ञानाच्या प्रत्येक शाखेंत, महात्माजींच्या प्रत्येक कार्यक्रमांत, प्रत्येक चळवळींत असे प्रकार अनेक वेळां घडले आहेत. यामुळे अभ्यासक हा गुदमरून जाऊन 'गांधी' या प्रचंड घटनेकडे मूढ होऊन पाहूं लागतो.
 गांधीवादाचा अभ्यास करून त्यावरून कांहीं निष्कर्ष काढणे हे काम कंठीण होण्याचे आणखी एक कारण आहे. महात्माजी कांहीं तत्त्वें, कांहीं विचार, कांहीं मतें ही अंतिम ध्येयाविषयींचीं म्हणून सांगतात व कांहीं मतें आजच्या व्यवहारास अनुलक्षून सांगतात; आणि या दोहोंचीं वाचकांच्या मनांतच नव्हे तर महात्माजींच्या लेखनांतहि सारखी गल्लत होत असते. त्यांच्या अंतिम रामराज्याचें जें रूप त्यांत कसल्याहि प्रकारचे यंत्र असणार नाहीं हें तर निश्चितच आहे. पण लुई फिशरशीं बोलतांना आजच सर्व आगगाड्या नष्ट झाल्या तरी मला मुळींच दुःख होणार नाहीं असें ते बोलून जातात. साध्य व साधने दोन्ही सारखींच शुद्ध असली पाहिजेत, या दोहींचा मी अभेद मानतो, असे एकदां म्हणतात. कोणच्याहि व्यवहारांत त्याला अपवाद नाहीं असें सांगतात. पण काँग्रेसचे कार्य हें शेकडा शंभर टक्के भांडवलदारांनीं दिलेल्या पैशावरच चालले आहे, हें दुर्दैवानें खरें आहे हे लुई फिशरजवळ प्रांजळपणे मान्य करतात. साध्य व साधने यांच्या या भेदाभेदांतून निश्चित निर्णय करणे जवळ जवळ अशक्य होऊन बसतें.