पान:भारतीय लोकसत्ता.pdf/१५९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१५८
भारतीय लोकसत्ता

प्रतिकार करण्याचे धैर्य, आत्मार्पण करण्याची सिद्धता या महनीय गुणांनी त्याला संपन्न केले. त्यामुळे या सत्याग्रह- संग्रामांचा इतिहास भारतीय लोकसभेच्या इतिहासांत अग्रस्थानीं राहील, यांत शंका नाहीं; पण हे संग्राम चालवितांना व आपल्या विधायक कार्यक्रमाचा प्रसार करतांना महात्माजींनी एक मोठे तत्त्वज्ञान प्रस्थापित केले आहे. त्या तत्त्वज्ञानाचा व्याप केवळ राजकारणापुरता मर्यादित नसून मानवाच्या इहपरलोकींच्या सर्व जीवनाला सामावून घेईल इतका तो मोठा आहे. त्याचे परीक्षण केल्यावांचून महात्माजींच्या कार्याचें परीक्षण पुरें होणार नाहीं. म्हणून आतां त्या तत्त्वज्ञानाचें म्हणजेच साधारणतः गांधीवाद म्हणून प्रसिद्ध असलेल्या सिद्धान्तसमूहाचे किंवा विचारप्रणालीचे विवेचन करण्याचा प्रयत्न करूं.
 गांधीवादाची चिकित्सा अवश्य खरी, पण ती फार अवघड आहे. जवळजवळ अर्ध शतकभर गांधीजींचें जीवनकार्य चालूं होतें. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रांत त्यांनीं कांहीं चळवळी केल्या आहेत व मतें सांगितली आहेत. त्यांच्या कार्याचा विस्तारहि असाच प्रचंड आहे. भरतभूमि ही जी त्यांची कर्मभूमि हीच अगोदर खंडप्राय आहे आणि त्यांनी येथे जे कार्य केले त्याचे पडसाद सर्व जगभर उमटलेले असून जगांतल्या अनेक पंडितांनीं, शास्त्रज्ञांनीं व कार्यकत्यांनी त्यांच्या कार्याविषयीं चर्चा केलेली आहे. या सर्वाचे मंथन करून कांहीं निर्णय ठरविणे हे मोठे दुष्कर आहे; पण एवढ्यानेच भागत नाहीं. गांधीवादाची चिकित्सा दुष्कर होण्याचे एवढेच कारण नाहीं. यापेक्षां जास्त महत्त्वाची अशीं दोनतीन कारण त्यांचा विचार केल्यावांचून आपणांस पुढे जाता येणार नाहीं आहेत.
 कोणच्याहि तत्त्वज्ञानांत जे भिन्न भिन्न सिद्धान्त सांगितलेले असतात, जी अनेक मते प्रगट केलेली असतात त्यांत कांहीं सुसंगति किंवा सुसूत्रता असावी अशी अपेक्षा असते. आतां ही सुसंगति राखणे फार अवघड आहे व अत्यंत थोर पुरुषांच्या भिन्न कृतीत व मतांतहि पुष्कळ वेळां विसंगति दिसते हें खरें; पण आपल्या भिन्न सिद्धान्तांत सुसंगति राखण्याचा ते प्रयत्न तरी करीत असतात. महात्माजींच्या बाबतींत ही मूलभूत अपेक्षाच विफल आहे. कारण, 'अशी सुसंगति राखणें हा माझा कधींच हेतु नसतो.