पान:भारतीय लोकसत्ता.pdf/१५८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१५७
गांधीवाद व लोकसत्ता

ते हक्क जो हिरावून घेतो त्याच्याविरुद्ध लढा करण्यास सिद्ध होणें व त्या लढ्यांत प्राणार्पणहि करण्याची तयारी करणे हे लोकसत्ताक देशांतील नागरिकांचे पहिले लक्षण होय. हा गुण नसेल तर स्वातंत्र्यांतहि लोकसत्ता टिकविणें शक्य नाहीं, मग पारतंत्र्यांत तर प्रश्नच नाहीं. हा एक गुण अंगीं येणे याचा अर्थ मानवाचे समूळ परिवर्तन होणे, त्याच्या जीवनांत सर्वस्वीं क्रांति होणें असा होतो. यासाठी त्याच्या मनाची क्षुद्रता नष्ट झाली पाहिजे, त्याचा दृष्टिकोन विशाल झाला पाहिजे, त्याच्या चित्तांत असंतोष निर्माण झाला पाहिजे, त्याच्या आकांक्षा वाढल्या पाहिजेत आणि त्यांच्या परिपूर्तीसाठीं वाटेल तो त्याग करण्याची त्याच्या मनाची सिद्धता झाली पाहिजे. प्राण देऊनहि कांहीं मिळविण्याजोगे आहे ही भावना क्षुद्र मानवांत नसते. जड शरीरांत प्राण धारण करून ठेवणे हे त्याचे अंतिम ध्येय असते. त्याला मरण पत्करूनहि कांहीं मिळविण्याजोगे आहे हे पटवून देणे व तशा कृतीस प्रवृत्त करणे यापेक्षां मानवाची व लोकसत्तेची जास्त मोठी सेवा कोणचीहि नाहीं. आपल्या अनेक सत्याग्रह संग्रामांनी महात्माजींनीं भारतीय जनतेत हें परिवर्तन घडवून आणले आहे आणि म्हणूनच भारतीय लोकसत्ता त्यांची अखंड ऋणी राहील.



प्रकरण सातवें


गांधीवाद व लोकसत्ता


अध्यात्मनिष्ठा

 भारतीय लोकसत्तेचा विकास व प्रगति घडवून आणण्याच्या काम महात्माजींनीं केवढे अलौकिक व बहुमोल कार्य केलें आहे, त्याचा विचार मागील लेखांत आपण केला. त्यांनीं आपल्या सत्याग्रह- संग्रामांनी भारतीय जनतेतील मानव जागृत केला आणि स्वाभिमान, राष्ट्रभक्ति, अन्यायाची चीड,