पान:भारतीय लोकसत्ता.pdf/१५७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१५६
भारतीय लोकसत्ता

लष्करापर्यंत नेऊन पोचविले. त्यांचे प्रत्यक्ष कार्य भारताबाहेर झाले असले तरी त्यांनीं तेथे दिलेल्या प्रेरणा हिंदुस्थानांत लष्करापर्यंत येऊन पोचल्या होत्या, हें १९४५- ४६ साली कलकत्ता, मुंबई व कराची येथे नौदळांत जी उठावणी झाली तीवरून दिसून येते. १८५७ च्या आधी एका पलटणीनें ब्रह्मदेशांत जाण्याचे नाकारले होते. त्या वेळी या आज्ञाभंगाबद्दल त्या सर्व पलटणीला तोफेच्या तोंडी देण्यांत आले होते. १९३० सालीं गढवाल- पलटणीनें सत्याग्रहीवर गोळ्या झाडण्यास नकार दिला, तेव्हां त्यांतील सैनिकांना १० ते १५ वर्षापर्यंतच शिक्षा झाल्या आणि त्यासुद्धां कांहींना. १९४३ व ४५ सालीं प्रत्यक्ष बादशहाविरुद्ध हिंदी लष्कर लढाईस उभे राहिले होते; पण या लष्कराला शिक्षा अशी जवळजवळ झालीच नाहीं. टिळक, गांधी व नेताजी यांचा हा महिमा आहे. त्यांनी कोणचें परिवर्तन, कोणची क्रांति घडवून आणली आहे, हे ब्रिटिशराजकर्त्यांना कळले. या अफाट जनसागराचे सामर्थ्य त्यांनीं ओळखले व शहाणपणाने माघार घेतली. लोकायत्त क्रान्तीच्या महायशाचे हे प्रथम लक्षण होय.
 टिळक व गांधी हे दोघेहि लोकशाहीचे निःसीम उपासक होते आणि म्हणूनच जनता जागृति हा त्यांच्या चळवळीचा आत्मा होता. महात्माजी हे स्वातंत्र्यप्राप्ति व लोकसत्तेची प्रस्थापना यापेक्षांहि उच्च हेतूने प्रेरित झाले होते. अखिल मानव्याकडे त्यांची दृष्टि होती. सत्य अहिंसेचे संदेश देऊन या मानव्याची उंची वाढवावी, असें बुद्धजीजसप्रमाणे त्यांचे ध्येय होते. प्रत्यक्षांत त्यांचा सत्याग्रह निःशस्त्र प्रतिकाराच्या वर जाऊं शकला नाहीं; पण लोकशाहीच्या दृष्टीने पाहतां तिच्या प्रस्थापनेस अवश्य ती लोकजागृति घडवून आणण्याचे महाकार्य त्यांच्या संग्रामांनी घडवून आणले आहे, यांत आतां शंका घेण्यास जागा आहे असे वाटत नाहीं. या संग्रामांनी शत्रूचा हृदयपालट झाला नसला तरी हा भारतीय समाज त्यामुळे आमूलाग्र बदलून गेला आहे. ब्रिटिश राज्यकर्ते व त्यांचे अगदी सामान्य अधिकारी यांच्याकडे मान वर करून बघण्याची ज्या खेडुतांना पूर्वी ताकद नव्हती, तेच आतां पूर्ण निर्भय बनले व त्या राज्यकर्त्यांना आव्हान देण्यास सिद्ध झाले. मानवत्वाची व म्हणूनच लोकशाहीची ही प्रगति केवळ असामान्य होय. आपल्या मूलभूत हक्कांची जाणीव होऊन