पान:भारतीय लोकसत्ता.pdf/१५६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१५५
जनताजागृति

असे माझे निश्चित मत झाले आहे; आणि म्हणूनच आम्हीं हें भारताचे अखेरचें स्वातंत्र्ययुद्ध आरंभिले आहे.' असे म्हणून नेताजींनीं शेवटी, 'राष्ट्रपिताजी, आमच्या या पवित्र स्वातंत्र्यसंगरांत आपला आम्हांला आशीर्वाद असावा.' अशी महात्माजींच्या चरणी प्रार्थना केली आहे.

टिळक- गांधी- नेताजी

 १९१७ सालापासून गांधीजींनी लढविलेले जे संग्राम त्यांचा अखेरच्या सशस्त्र क्रान्तीशीं कसा अविभाज्य संबंध आहे, ती अखेरची क्रान्ति म्हणजे पूर्वीच्या संग्रामांचीच कशी परिणति आहे, हें नेताजींच्या वरील उद्गारांवरून स्पष्ट होईल. १८८० सालापासून या देशांत ज्या चळवळी झाल्या त्या सर्वांचा लोकजागृति हा हेतु होता. त्या महाशक्तीच्या सामर्थ्यानेंच स्वातंत्र्यप्राप्ति करून घ्यावयाची हे टिळकांनीं प्रारंभीच निश्चित करून अखिल भारतीय जनतेच्या अंगच्या सुतशक्तीला आवाहन करण्यास प्रारंभ केला आणि चाळीस वर्षांच्या आपल्या अविरत तपश्चर्येने जागृतीचे लोण त्यांनी सुशिक्षित मध्यमवर्गापर्यंत आणून ठेविलें. बहुसंख्य जनतेत शिरावयाचें व कायदेभंग व करबंदी- म्हणजेच बहिष्कार योग या मार्गानें लढा करावयाचा अशी योजना आंखून जागृत होत चाललेल्या मध्यमवर्गाला जनतेत मिसळण्याचा व तेथे राजकीय जागृति घडवून आणण्याचा ते सारखा उपदेश करीत होते; पण बहिष्कारयोगाचा प्रत्यक्ष आचार त्यांना त्यांच्या आयुर्मानत घडवून आणतां आला नाहीं. ते कार्य महात्माजींनीं केलें. सुशिक्षित मध्यमवर्गाच्या कक्षेतून अनंतमुखांनी पाट फोडून त्यांनी हा जागृतीचा लोंढा कष्टकरी जनतेपर्यंत नेऊन पोचविला. तिसरी कक्षा लष्कराची. देश परक्यांच्या अधीन असतांना हा सैनिकांचा वर्ग सर्वात प्रतिगामी व संस्कार- अक्षम असा असतो. तो तसाच रहावा अशी जेत्यांनी बुद्धिपुरःसर योजना केलेली असते. म्हणून लोकशाही पद्धतीनें निर्माण केलेल्या जागृतीच्या लाटा तेथे सर्वात शेवटीं पोचतात. त्या तेथे पोचल्या की लोकजागृतीच्या कार्याची सांगता होते. ही सांगता नेताजींनीं घडवून आणली. बहुसंख्य जनतेंत महात्माजींनीं निर्माण केलेला प्रक्षोभ, स्वत्वाचा अभिमान, आत्मविश्वास व अन्यायाच्या प्रतिकारार्थ आत्मार्पण करण्याची बुद्धि हे गुण त्यांनीं हिंदी